सिंधुदुर्गतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत रायगड पोलीस संघाने विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग करंडक पटकावला. पंचक्रोशी गडब संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिलखूश आवस व ओमकारेश्वर पनवेल या संघांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. संत तुकाराम देहेन संघाला शिस्तबद्ध संघाचे बक्षीस देण्यात आले. पंचक्रोशी गडवची ऋणाली पाटील-मोकल हिला स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. रायगड पोलीस संघाची नीलिमा जाधव हिला उत्कृष्ट पकडीचे तर रायगड पोलीस संघाची माई पाटील हिला उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक देण्यात आले.
लेक वाचवा हे घोषवाक्य असलेली स्पर्धा पाक्षिक सिंधुदुर्गतर्फे रायगड पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात रायगड पोलीस संघाने पंचक्रोशी गडब संघाचा २१-१४ असा पराभव केला. रायगड पोलीस संघाची माई पाटील हीने आक्रमक चढाया केल्या. तिला नीलिमा जाधव व पुनम म्हात्रे, प्रतीक्षा मोकल यांनी चांगली साथ मिळाली. पंचक्रोशी गडब संघाच्या ऋणाली पाटील, ऊर्मिला घासे, चंद्रिका कटोर छान खेळल्या. उपांत्य फेरीत रायगड पोलीस संघाने दिलखूश आवस संघाचा अटीतटीच्या लढतीत २२-२१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य लढतीत पंचक्रोशी गडब संघाने ओमकारेश्वर पनवेल संघावर २७-१५ अशी सहज मात केली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. माजी आमदार मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र महापदी, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे. जे. पाटील, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष निगडे, विक्रम चालकमालक संघाचे अध्यक्ष विजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष योगेंद्र मगर, दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे, अनंत म्हात्रे, नंदकुमार महाजन यांनी स्पर्धेला भेट दिली. सायकलपटू सुमीत पाटील याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
दिलदार थळे, पुरुषोत्तम पिंगळे, प्रसन्ना पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. जे. जे. पाटील यांनी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. विश्वनाथ पाटील यांनी समालोचन केले. राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र महापदी यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस आर. एस. आय. पालशेतकर, क्रीडाप्रमुख श्रीकांत म्हात्रे, सुधीर पाटील, मुन्ना मास्तर, दत्ता मास्तर, भांबळे मास्तर, संजय मोकल यांच्यासह रायगड पोलीस संघाच्या खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. प्रकाश सोनवडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhuratna trophy won by raigad police team