परवानाधारकांना दोन वर्षांंची मुदत; अन्यथा परवाना रद्द होणार
कृषी केंद्र, खत आणि कीटकनाशक विक्री, उत्पादन, साठवणूक, वितरणासाठी परवाना पाहिजे असल्यास बी.एससी. कृषी, कृषी रसायनशास्त्र पदवीधर, कृषीशास्त्र विषयातील पदविका, बी.एससी. रसायनशास्त्र स्नातकोत्तर पदवीसह पीएच.डी. किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यातील खत आणि कीटकनाशक परवानाधारकांकडे यापैकी एकही पदवी नसेल, तर दोन वषार्ंच्या आत ही शैक्षणिक अर्हता त्यांनी पूर्ण करण्याचा अध्यादेश राज्याच्या कृषी संचालकांनी काढला आहे; अन्यथा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
राज्यात कुठेही कृषी केंद्र सुरू करायचे असेल, तर पहिले किमान कृषी पदविका ही अर्हता ग्राह्य़ धरली जात होती. नंतर ती शिथील करण्यात आली. मात्र, कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रक) जयंत देशमुख यांनी नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. कीटकनाशकांचे उत्पादन, विक्री, साठवणूक, विक्रीकरिता प्रदर्शित करणे, वितरण करणे यासाठी तांत्रिक श्रेणी असलेल्या कीडनाशकांच्या उत्पादन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांकडे रसायनशास्त्राच्या स्नातकोत्तर पदवीसह पीएच.डी. किंवा अभियांत्रिकी रसायनशास्त्राची पदवी अनिवार्य करण्यात आली आहे.
कीडनाशकांच्या उत्पादनासाठी अर्जदार कृषी रसायनशास्त्राचा पदवीधर असणे तसेच कीडनाशक विक्री परवान्यासाठी कृषी, जैव रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवन विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र यातील एका विषयाची पदवी आवश्यक आहे. दरवर्षी परवाना नूतनीकरण करताना सर्व परवानाधारकांना शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक केले आहे, दोन वर्षांतून एकदा पायाभूत सुविधा, उत्पादन स्थळ, साठवणूक स्थळ व अभिलेखाची तपासणी अनिवार्य केली आहे. कीटकनाशकाचा उत्पादन परवाना तात्पुरती नोंदणी संपुष्टात येईल त्याच दिवशी कालबाह्य़ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र संचालकांसमोर पेच
कृषी आयुक्तालयाच्या या नवीन नियमावलीमुळे राज्यातील हजारो कृषी केंद्र संचालकांसमोर पेच उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील बहुतांश कृषी केंद्र संचालकांकडे बी.एससी. कृषी किंवा परवान्यासाठी आवश्यक पदवी, पदविका नाही. त्यामुळे या सर्वाना कृषी केंद्र पुढेही सुरू ठेवायचे असेल तर दोन वर्षांत बी.एससी. कृषी, रसायनशास्त्र या विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य झाले आहे किंवा त्यांना एखाद्या याच विषयातील तज्ज्ञ व्यक्तीस नोकरीवर ठेवून त्याच्या परवान्यावर व्यवसाय करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Specific educational qualification for agriculture permissions center