किरकोळ वादावरुन परभणीत अमरदीप रोडे या शिवसेना नगरसेवकाची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघे मारेकरी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, अमरदीप रोडे हे परभणीतील प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेनेचे नगरसेवक होते. प्रभागात पाण्याची अडचण निर्माण झाल्याचा काही महिलांचा त्यांना फोन आला, त्यानुसार ते सकाळी १० वाजता जायकवाडी परिसरात गेले. यावेळी रोडे यांचे सहकारी रवी गायकवाड आणि किरण डाके यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबतच इथल्या पाण्याच्या अडचणीवरुन वादावादी झाली. हा वाद नंतर इतका विकोपाला गेला की, गायकवाड आणि डाके यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. तसेच ते जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, रोडे यांचा मृत्यू झाल्याचे पाहताच त्यांच्या दोघाही मारेकऱ्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती वेगाने शहरात पसरली त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The murder of the shiv sena corporator for minor reason at parbhani