बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या दमदार अभिनयासोबत फिटनेससाठीही ओळखला जातो. वयाच्या ४७ व्या वर्षीही हृतिकनं त्याचा फिटनेस उत्तम सांभाळला आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतो. हृतिकनं शेअर केलेला कोणताही फोटो काही वेळातच तुफान व्हायरल होतो. आताही असंच काहीसं घडलंय. हृतिकनं नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळत आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर शाहिद कपूर आणि अन्य सेलिब्रेटींनीही हृतिकच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
हृतिक रोशननं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये हृतिकचा शर्टलेस लूक पाहायला मिळत आहे. वाढलेली दाढी आणि टोन्ड बॉडी अशा लूकमध्ये तो कमालीचा डॅशिंग दिसत आहे. हृतिकचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून त्याच्या फोटोवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
हृतिकच्या चाहत्यांसोबत अभिनेता शाहिद कपूरलाही त्याच्या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. हृतिकच्या फोटोवर कमेंट करताना शाहिद कपूरनं लिहिलं, ‘हार्ड मुंडा’ हृतिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून या फोटोला काही तासांमध्येच १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं तर तो २०१९ मध्ये ‘सुपर ३०’ आणि ‘वॉर’ अशा दोन चित्रपटांमध्ये दिसला होता. त्यानंतर हृतिक बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण लवकरच तो ‘फायटर’ या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हृतिक आणि दीपिका या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.