करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वांना आपापल्या घरातच बंदीस्त व्हावं लागलं. लॉकडाउनदरम्यान सर्वांनाच घरातली सर्व कामं करावी लागली. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद ठरले नाहीत. काहींनी स्वयंपाक केला, काहींनी घर साफ केलं तर काहींनी भांडी घासली. या सर्व कामांचे व्हिडीओसुद्धा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केले. आश्चर्याची बाब म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा या घरकामांना मुकले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉकडाउनमध्ये झाडू मारणे, फरशी पुसणे यांसोबतच घरातील इतर कामं केल्याचा खुलासा बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये केला. १५ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात कोलकाताच्या रुणा साहा हॉटसीटवर बसल्या होत्या. लॉकडाउनदरम्यान घरकामातच व्यस्त राहिल्याचं रुणा यांनी बिग बींना सांगितलं. याच संधीचा फायदा घेत एक्स्पर्ट गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या रिचा अनिरुद्ध यांनी बिग बींना घरकामाबद्दल प्रश्न विचारला.

आणखी वाचा : अभिनेत्याच्या आजारपणामुळे चमकलं सलमानचं नशिब; आज ‘भाईजान’ धावून आला त्याच्या मदतीला 

त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना बिग बींनी घरातील सर्व काम केल्याची कबुली दिली. मग ते झाडू मारणं असो किंवा फरशी पुसणं. लॉकडाउनदरम्यान बिग बी फक्त एकाच कामात कुटुंबीयांची मदत करू शकले नाही. ते म्हणजे स्वयंपाक. स्वयंपाकातील काहीच माहिती नसल्याने ते करू न शकल्याचंही त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. यावर विश्वास ठेवणं अवघड असल्याचं रिचा यांनी मजेशीरपणे म्हटलं. पण बिग बींनी घरी ही सर्व कामं केल्याचं त्यांना पटवून दिलं.

घरातील ही सर्व कामं करताना त्यांना घरकाम करणाऱ्यांचं महत्त्व पटल्याचंही बिग बींनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc amitabh bachchan admits to have done jhaadu and pochha during lockdown ssv