गाजलेल्या चित्रपटाचे गाजलेल्या चित्रपटाचे कथानक आणि त्यातील कलावंतांनी जिवंत केलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात. मात्र अशा संस्मरणीय ठरलेल्या चित्रपटाची अतिशय ढिसाळ आणि कंटाळवाणी तसेच अतार्किक मांडणी आजच्या काळाच्या संदर्भात करून चित्रपट बेतण्याचा प्रकार ‘शासन’ या चित्रपटाच्या बाबतीत केला आहे, असे नमूद करावे लागेल. त्यामुळे प्रेक्षक कंटाळतो. बडे कलावंत ही या चित्रपटाची जमेची बाजू नक्कीच ठरत असली तरी ते पुरेसे ठरत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या काळातील राजकारण दाखविताना घटनांची मांडणी जुन्या काळातील चित्रपटाप्रमाणे करताना त्या चित्रपटाची लोकप्रियता, त्यातील व्यक्तिरेखांना उत्तमोत्तम प्रसंगातून दिलेला उठाव, व्यक्तिरेखांचा संघर्ष लेखक-दिग्दर्शकाने लक्षात घ्यायला हरकत नव्हती; परंतु ‘शासन’मध्ये ते दिसत नाही.

एकीकडे सत्ताधारी पक्षातील राजकारण्यांची एकमेकांवरची कुरघोडी, सचिव, त्याचे महत्त्व, मंत्र्याला मिळणारी जयराज नावाच्या गुंडाची मदत, कारखान्यावर हातोडा चालवून त्या जागी टाऊनशिप उभारण्याचा कट, त्यात कामगार नेत्यालाच थेट मंत्री म्हणून निवडून आणण्याचा यशस्वी प्रयत्न, एकंदरीत सत्तेसाठी वाट्टेल ते करावे लागते हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न चित्रपट करतो.

एका बाजूला सत्तेचे राजकारण, त्यासाठी शह-काटशह असे दाखवितानाच दुसरीकडे मनवा नाईकच्या भूमिकेतील पत्रकार शोधपत्रकारितेमार्फत जयराज नावाच्या गुंडाची गैरकृत्ये चव्हाटय़ावर आणण्यासाठी प्रयत्न करते, तर शासकीय अधिकारी आणि सचिव असलेली मकंरद अनासपुरेची व्यक्तिरेखा जी प्रमुख व्यक्तिरेखा असून राजकारण किती रसातळाला जातेय, त्यासाठी प्रसंगी किती जणांवर अन्याय होतोय, हे निमूटपणे पाहत राहतो, अशी निरनिराळी कथानके एकाचवेळी दाखविण्यात आली असून त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध याचे प्रसंग पाहताना प्रेक्षक गोंधळतो. पत्रकार तरुणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिचा मित्र असलेला कामगार नेता, तिचे वडील तसेच तिचा स्नेही असलेला सरकारी अधिकारी सारेच तिला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करतात. मात्र तिला तिची वकील मैत्रीण साथ देते. लढा कसा देते, गुंडांना शासन होते किंवा नाही याभोवती चित्रपट फिरतो.

मकरंद अनासपुरे, मनवा नाईक, जितेंद्र जोशी, वृंदा गजेंद्र यांच्यापासून ते सर्व दिग्गजांचा अभिनय हे चित्रपटाचे सामथ्र्य असले तरी सर्व प्रमुख कलावंतांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचे स्वभाव, त्यातील विविध छटा, अनेक व्यक्तिरेखांच्या स्वतंत्र कथानकांची सरमिसळ यामुळे प्रेक्षकाचा गोंधळ वाढतो, त्यामुळे चित्रपट भिडत नाही आणि कंटाळवाणा ठरतो.

शासन

निर्माता – शेखर पाठक

दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे

पटकथा-संवाद – गजेंद्र अहिरे

छायालेखक – सूर्या मिश्रा

संगीत – नरेंद्र भिडे

कलावंत – मकरंद अनासपुरे, मिलिंद शिंदे, विक्रम गोखले, जीतेंद्र जोशी, भरत जाधव, मोहन जोशी, सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक, नागेश भोसले, आदिती भागवत, वृंदा गजेंद्र, किरण करमरकर व अन्य.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review on shasan