टेलिव्हिजन विश्वामध्ये आजकाल सर्वच कलाकार फार कमी कालावधीतच प्रसिद्धी मिळवतात. त्यातही काही कलाकार भलत्याच कारणांमुळे प्रकाशझोतात येतात. या काही कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे राखी सावंत. आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत बऱ्याच कारणांनी चर्चेत असते. पण, यावेळी मात्र राखीच्या नावामुळे तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर चर्चेत आला आहे. राखी आणि अभिषेक अवस्थी यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. पण, त्यांचे हे नाते काही फार काळ टिकू शकले नाही.
राखी आणि अभिषेक या दोघांच्याही नात्याला तडा जाऊन आता बराच काळ लोटला. किंबहूना अभिषेक लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबद्ध होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिषेक अवस्थी अंकिता गोस्वामीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या याच प्रेमाच्या नात्याला एक वेगळे वळण देण्यासाठी या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि अंकिताचा फोटो बरात चर्चेत आहे. या दोघांनीही नुकताच एका खासगी समारंभात त्यांचा साखरपुडा आटोपला.
अंकिता गोस्वामीचे टेलिव्हिजन विश्वासोबत कोणत्याही प्रकारचे नाते नाहीये. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याच्या साखरपुड्याची माहिती दिली. ‘अंकिताचे कुटुंब टेलिव्हिजन विश्वातून नसल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा समारंभ नको हवा होता. त्यामुळे माझ्या मुंबईतील राहत्या घरीच हा छोटेखानी समारंभ पार पडला’. यावेळी अभिषेक आणि अंकिताला शुभेच्छा देण्यासाठी काही निवडक पाहुण्यांनी आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली होती.