काही नाटकं, त्यामधील पात्र ही कालातीत असतात. काळ कितीही बदलला. स्मार्ट झाला, टेक्नोसॅव्ही झाला तरी त्या गोष्टी आपल्याला अजूनही भुरळ पाडतात आणि पुन्हा एकदा बरंच काही नव्याने देऊन जातात. असंच एक नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’ आणि त्यामधलं एक गाजलेलं पात्र म्हणजे मंजुळा साळुंखे. पुलंची लेखणी किती सुंदर असू शकते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण. सुरुवातीला भक्ती बर्वेनी मंजुळा साकारली, त्यानंतर प्रिया तेंडुलकर आणि सुकन्या कुलकर्णी यांनीही. वामन केंद्रे यांनी या नाटकाला संगीताची सुरेथ साथ देत अमृता सुभाषला घेऊन रंगमंचावर आणलं आणि त्याचेही कौतुक झाले. आता हेमांगी कवी मंजुळाची भूमिका साकारत असून या नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोगही पूर्ण झाले. त्या निमित्ताने अमृता आणि हेमांगी या दोन युवा अभिनेत्रींना मंजुळा कशी भासली, वाटली, त्यांच्याकडून काय शिकता आलं, हे समजून घेणं कुणाला आवडणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली, फुलं विकत आपली भाषा फुलवण्यासाठी प्रयत्नशील असलेली मंजुळा आजही प्रत्येक तरुणीला भुरळ पाडते. थोडीशी अल्लड, मनस्वी वाटत असली तरी ‘तुला शिकविन चांगला धडा’ म्हणत कोणताही अन्याय ती खपवून घेत नाही. त्यामुळेच ती प्रत्येक तरुणीमध्ये भिनते, तिला काहीवेळा झपाटून सोडते, तर काहीवेळा हे अस्सं का करायला हवं, याचं उत्तरही देते.

वामन केंद्रे यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकाला संगीताची जोड देत एक वेगळ्याच उंचीवर हे नाटक नेऊन ठेवलं. यामध्ये अमृता सुभाषचा अभिनय कौतुकपात्र ठरला होता. तिला ही मंजुळा सकारात्मक ऊर्जा देणारी वाटली. परिस्थिती नसली तरी स्वप्नं मोठीच पाहायला हवीत आणि चांगली मेहनत घेतली तर हवं ते मिळवता येऊ शकतं, हे सांगणारी मंजुळा वाटली. गरीब असली, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असली तरी तिला आपली भाषा सुधाराविशी वाटते, हा बदल करावासा वाटणं, हे फारच वेगळं आहे. अशोक जाहगीरदार यांच्याकडे जाऊन ती भाषा शिकता-शिकता त्यांच्या प्रेमात पडत असली तरी त्यांच्याबद्दल तिला आदर असतो. त्यांच्याकडून झालेला अन्याय सहन करणं तिच्याकडे नाही. स्वत:ला नवनवीन बनवत राहणं, हे मंजुळाकडून शिकावं, असे बरेच पदर या मंजुळाच्या भूमिकेमध्ये असल्याचं अमृता सांगते, तेव्हा काही क्षणात तुमच्या डोळ्यापुढे काही क्षण का होईना ‘फुलराणी’ तरळून जाते.

राजेश देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’ करण्याचं ठरवलं आणि त्यासाठीच्या पात्रांना बोलावलं. हेमांगी जेव्हा या नाटकासाठी पहिल्यांदा देशपांडे यांना भेटली तेव्हा ‘या नाटकातली कोणती भूमिका करायची,’ असा निरागस प्रश्न तिने त्यांना विचारला. त्या वेळी ‘तूच मंजुळा करणार’ हे ऐकल्यावर हेमांगीला विश्वासच बसेना. ते मला जमेल का? इथपासून हेमांगीची सुरुवात होती.  एवढय़ा मोठय़ा नाटकात प्रमुख भूमिका करायला मिळेल, हे तिच्या गावीही नव्हतं. संहितेचं वाचन झालं. तालीम सुरू असताना देशपांडे यांनी हेमांगीला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती अशी.. हे नाटक मराठी प्रेक्षकाला तोंडपाठ आहे. त्यामुळे तू जेव्हा पहिला प्रयोग करशील तेव्हा हा पाचशेवा प्रयोग असल्यासारखा तुझ्याकडून व्हायला हवा. यानंतर हेमांगीने कंबर कसली. आणि आता शंभरावा प्रयोग करतानाही हा माझा पहिलाच प्रयोग असल्याचं मनात ठेवत हेमांगीने काम केलं.

मंजुळा आपलीशी का वाटते, कारण ती प्रत्येक मुलीमध्ये ती लपलेली आहे. तिची जगण्याची धडपड प्रत्येक सामान्य मुलीसारखीच आहे. अभिनेत्री म्हणून सादरीकरण कसं असावं, बोलावं कशी, भाषा कशी असावी, हे प्रश्नही मला पडले. पण अनुभवाने या साऱ्या गोष्टी मला येत गेल्या. तिची जगण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची जी इच्छा आहे ती प्रत्येक प्रांतामध्ये, मुलीमध्ये असते. त्यामुळे मला ही तर माझीच गोष्ट वाटते, असं हेमांगीला मंजुळा करताना वाटलं. जेव्हा मी पहिला प्रयोग करत होते, तोपर्यंत मला विश्वास वाटत नव्हता, मी ‘ती फुलराणी’ करते आहे. यापूर्वी हे नाटक फार गाजलेलं होतं. भक्तीताईंनी ते केलं होतं. त्यांची नक्कल मी करण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी केला. नाटकात फुलवालीची आणि फुलराणीची भूमिका करता आवाजात कमालीचा बदल केल्याचे हेमांगी सांगत होती आणि या भूमिकेसाठी तिने घेतलेली अथक मेहनत समजत होती.

हेमांगीचं हे नाटक सुरू झाल्यावर काही प्रयोगांनंतर संहितेला धक्का लावला असल्याचे आरोपही झाले. पण नाटकाची लांबी कमी करताना काही भाग वगळला गेला. पण पुलं.च्या शब्दांना कुठेही धक्का लावला नाही, असं हेमांगीने ठामपणे सांगते.

प्रेम आणि भाषा या दोन्ही गोष्टी कालातीत अशाच. प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या. कोणत्याही काळात न बदलणाऱ्या या दोन गोष्टी. या दोन गोष्टींचं सुरेख मीलन म्हणजे हरित तृणांच्या मखमालीवर खेळणारी ‘ती फुलराणी’, जी पाहून आपल्यामध्ये ती जिवंत ठेवण्याची मनीषा प्रत्येक मुलीमध्ये असेलच. महान लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पिग्मॅलिअनवर आधारित पुलं.नी फुलराणी लिहिलं आणि तिचा सुगंध अजूनही दरवळत आहे आणि तो कायमच राहील. काळ कितीही बदलला तरीही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ti phulrani drama completed 100 shows