संदेश पाठविण्यापासून ते व्हिडीओ रेकॉर्डिगपर्यंत आणि गाणी ऐकण्यापासून टीव्हीवरील मालिका पाहण्यापर्यंत सगळय़ाच गोष्टींसाठी मोबाइलचा वापर होत आहे. मोबाइल टीव्ही ही संकल्पना जुनी असली तरी त्यामध्ये सध्या झपाटय़ाने बदल होत आहेत. बाह्य़ कंपन्यांबरोबरच वाहिन्याही मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांच्या मालिका लोकांपर्यंत पोहचवू लागल्या आहेत. यात आता ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ ही संकल्पना घेऊन एखाद्या मालिकेचा विशिष्ट भाग पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीव्ही वाहिन्यांची स्पर्धा आता टीव्हीपुरती मर्यादित न राहता ती आता अ‍ॅपपर्यंत पोहचू लागली आहे. ‘हॉटस्टार’ आणि ‘डिट्टो टीव्ही’मध्ये सध्या चांगलीच स्पर्धा सुरू आहे. मात्र यावरून उपलब्ध होणाऱ्या आशयासाठी ठरावीक वर्गणी द्यावी लागत होती. आता त्याच्या पलीकडे जाऊन मोफत व्हिडीओ उपलब्ध करून देणारे ‘ओझी’ (९ी) नावाचे अ‍ॅप ‘झी डिजिटल कन्व्‍‌र्हजन्स लिमिटेड’तर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अ‍ॅप पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये ‘झी टीव्ही’च्या सर्व भाषांमधील वाहिन्यांवरील मालिका उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे ‘डिट्टो टीव्ही’, ‘झी डिजिटल’ आणि ‘ट्रान्सपोर्ट डॉट कॉम’चे तंत्रज्ञान प्रमुख करण जैतापकर यांनी स्पष्ट केले. यामध्ये मालिकेत ज्याप्रमाणे जाहिराती येतात त्याप्रमाणेच जाहिराती येणार आहेत. या अ‍ॅपमधून ऑफलाइन डाऊनलोड करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या प्रेक्षकांना तातडीने सगळे हवे असते. यामुळे प्रेक्षकांकडून अशा प्रकारच्या मोबाइल अ‍ॅपना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. हे अ‍ॅप विकसित करताना कमीत कमी बँडविड्थवर उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे टूजी असलेल्या ग्राहकांनाही व्हिडीओ पाहता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये मालिकेच्या वेळेच्या दहा मिनिटांनी मालिकेचा भाग उपलब्ध होणार आहे. याचबरोबर मालिकेच्या भागाच्या व्हिडीओचेही तीन भाग करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना नेमका जो भाग पाहावयाचा आहे तो पाहता येणार असल्याचेही जैतापकर म्हणाले. याचबरोबर अ‍ॅपमध्ये ‘झी’ वाहिनीवरील सर्व मालिकांचा संग्रहही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अ‍ॅप्समुळे टीव्हीच्या प्रेक्षकांची संख्या कमी होते का, या प्रश्नाला उत्तर देताना जैतापकर म्हणाले की, टीव्हीचा प्रेक्षक आणि डिजिटल म्हणजे मोबाइल माध्यमावरील प्रेक्षक वेगळा आहे. यामुळे टीव्हीचा प्रेक्षक इकडे वळण्याचे प्रमाण खूपच कमी असेल. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video on demand app by zee