दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गायक अभिजीत भट्टाचार्य वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. एका टीव्ही पत्रकाराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला होता. केजरीवाल यांनी याच ट्विटला रिट्विट केले. हा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीचा आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला अभिजीत हे बोलताना दिसत आहे की, ‘अरे सोडा, कुठलं स्वातंत्र्य आहे. घाणेरडा देश आहे आपला, गुलामी करणारा देश आहे… अजून काय बोलू..’ या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘आता अभिजीतवर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, कारण तो भाजपाचा चमचा आहे..’ अशा प्रकारची प्रतिक्रिया शाश्वत याने या व्हिडिओवर दिली होती. तर विनीता यांननी लिहिले आहे की, ‘अभिजीतची प्रतिक्रिया हेच दाखवून देते की कोण घाणेरडं आहे. देश की अभिजीत स्वतः…’ दुसरीकडे ‘अभिजीत न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा आहे का? तो भारताबद्दल अशी वक्तव्य करु शकतो पण त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही.’ असा प्रश्न विनय कुमार गुप्ता यांनी विचारला.
सोशल मीडियावर या बातमीला अजून महत्त्व देण्याकडे काहींनी नकार दर्शवला आहे. काही दिवसांपासून अभिजीत सोशल मीडियावर फार सक्रिय झाला आहे. आपल्या वादग्रस्त ट्विट्सवरुन तो नेहमीच चर्चेत येत असतो. यामुळे जनतेच्या रोशालाही त्याला अनेकदा सामोरे जावे लागते. एका महिला पत्रकाराला अपशब्द बोलल्याबद्दल अभिजीतच्या विरुद्ध आपची नेता प्रिती शर्मा मेनन यांनी तक्रार दाखल केली होती.
काही दिवसांपूर्वी अभिजीतने ट्विटवर महिला पत्रकार स्वाती चतुर्वेदीला अपशब्द वापरले होते. जेव्हा आप नेत्या प्रिती यांच्या सोबत इतर महिलांनी अभिजीतच्या या वागण्याचा विरोध केला तेव्हा तो त्यांच्यासोबतही उद्धटपणेच बोलला. प्रितीने जेव्हा अभिजीतच्या या वर्तवणूकीबद्दल पोलिस आयुक्तांना ट्विट केले तेव्हा त्याने त्यांच्या विरोधात शिवीगाळ केली. यामुळे अभिजीतच्या विरोधात आयपीसी कलम ५००, ५०९ आणि आयटी कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
Abhijeet singer insulting our country , will there be an FIR for such a disrespect . pic.twitter.com/MgaDIj5ksM
— Gurpreet Garry Walia (@garrywalia_) October 20, 2016