आगीत मित्राचाही मृत्यू
डोंगरीच्या महाराजा गेस्ट हाऊसमध्ये लागलेल्या आगीत गेस्टहाऊसचा चालक प्रदीपन नारायण (४०)आणि त्याचा मित्र कुमार (५०) या दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रदीपनने आग लावून आत्महत्या केली असावी आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कुमारचाही मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
  डोंगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्थानिक लोकांना गेस्ट हाऊस मधून आगीचा धूर दिसत होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गेस्ट हाऊसचे शटर तोडले. आतमध्ये प्रदीपन आणि कुमार यांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी पोलिसांना मद्याच्या बाटल्या आढळल्या. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले आल्याचे डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकणे यांनी सांगितले.
या गेस्ट हाऊसचा मॅनेजर अब्दुल याची सप्टेंबर महिन्यात हत्या झाली होती. या गेस्ट हाऊसचा सफाई कर्मचारी सुलेमान याने त्याची हत्या केली होती. त्याप्रकरणा संदर्भात प्रदीपन याची पोलीस चौकशी करत होते. अनेक वेळा त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. प्रदिपन पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या चौकशीमुळे दबावात असावा, असा आरोप गेस्टहाऊसचा मालक सुहेल काश्मिरी याने केला आहे तर प्रदीपन चौकशीला सहकार्य करत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकणे यांनी दिली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dongari guesthouse operator self burned