मुंबई : राज्यभर विविध समाजोपयोगी कामांत झोकून दिलेल्या कार्यरतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या चौथ्या पर्वासाठी निवडप्रक्रियेला वेग आला असून, नोंदणीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे ‘तेजांकितां’ना नोंदणीची आजची अखेरची संधी आहे.
गेल्या दोन वर्षांत करोना महासाथीने ग्रासलेल्या परिस्थितीतही राज्यातील कानाकोपऱ्यांत तरुण-तरुणींचा ताफा आपापल्या परीने समाजोपयोगी कामांत स्वत:ला झोकून देत होता. औषधनिर्मितीमधील संशोधनापासून ते करोनाबाधितांना रुग्णालयात खाटा मिळवून देण्यासाठीची व्यवस्था उभारण्यापर्यंत शहरगावांत असे कितीतरी तरुण स्वप्रेरणेने काम करीत होते. त्यांतून तेजांकितांची निवड यंदाही केली जाणार आहे. गगनालाही गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून जिद्दीने, सातत्याने नवनवीन कल्पना – तंत्रज्ञान – संशोधनाच्या आधारे विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचे नवे क्षितिज गाठणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. ‘भविष्यानेही आशेने पहावे, अशा वर्तमानाचा गौरव’ या घोषवाक्यासह सुरू झालेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. करोनामुळे तिसऱ्या वर्षीचा पुरस्कार सोहळा लांबला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हा सोहळा पार पडला. तीन वर्षांत विविध क्षेत्रांतील ४६ कर्तृत्ववान तरुण तेजांकितांचा सन्मान या पुरस्कारांच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने केला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, क्रीडा, उद्योग आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठणाऱ्या तरुणाईला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
प्रवेशिका ऑनलाइन
नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची जोड देत भरीव कार्य उभारणाऱ्या तरुणाईचा शोध घेण्यासाठी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचा हा मंच सज्ज झाला आहे.
प्रायोजक : देशाचे भविष्य घडवू
पाहणाऱ्या वर्तमानातील तरुण शिलेदारांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हे मुख्य प्रायोजक लाभले आहेत. तर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या पुरस्कारांसाठी सहप्रायोजक आहेत.
प्रवेश अर्ज कसा भराल? https://taruntejankit.loksatta.com येथून प्रवेशिका भरायची आहे. क्यूआर कोडद्वारेही सहभाग घेता येईल.