मुंबई : ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाचा सांगता सोहळा शुक्रवार, २५ नोव्हेंबरला दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवादरम्यान ओळख करून देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाची यंदा तपपूर्ती. या बारा वर्षांत या उप्रकमांतर्गत १२२ संस्थांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. वाचक-देणगीदारांनी मदतीचा हात देत या सर्व संस्थांच्या कार्याला पाठबळ दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

   यंदा या उपक्रमात ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’, ‘स्वस्तिक फाऊंडेशन’, ‘अवनि’, ‘डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर’, ‘निर्मिती प्रतिष्ठान’, ‘स्नेहांचल’, ‘रिअल लाईफ, रिअल पीपल्स’, ‘सुधर्मा ज्ञानसभा’, ‘प्रतीक सेवा मंडळ’ आणि ‘सिटिजन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन’ या संस्थांची माहिती देण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा प्रतिसाद देत दानशूरांनी या संस्थांचे हात बळकट केले आहेत. कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने दिलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवापासून सुरू असलेल्या या दानयज्ञाची सांगता शुक्रवारी होईल. त्यात या संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येतील.

कधी? शुक्रवार, २५ नोव्हेंबर, सायंकाळी ५.३० वाजता

कुठे? दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sarva karyeshu sarvada initiative on november 25 actor girish kulkarni chief guest ysh