मोबाइल घेताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही, याची शाश्वती नाही. घाटकोपरच्या एका तरुणाला हाच अनुभव आला व त्याच्या नावावर शेकडो सिम कार्ड वितरित झाल्याचे उघड झाले आहे. घाटकोपरच्या अमेय विलास परब (२४) याने चार वर्षांपूर्वी घराजवळील दुकानातून एका कंपनीचे सिम कार्ड विकत घेतले. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र आणि छायाचित्र, शिधापत्रिका आदी कागदपत्रे सादर केली. नऊ महिन्यांपूर्वी त्याला अंधेरी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर धक्का बसला. पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड विकणारी एक टोळी पकडली होती. त्या टोळीकडे अमेय परब याच्या कागदपत्राच्या आधारे तयार केलेले शेकडो बनावट अर्ज सापडले होते. प्रत्येक अर्जावर अमेयचाच फोटो व निवडणूक ओळखपत्र जोडलेले होते. ज्या दुकानात अमेयने कागदपत्रे सादर केली होती त्या दुकानदारानेही कंपनीचे एजंट ही कागदपत्रे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी या दोघांचे जबाब घेऊन नंतर त्यांना सोडून दिले होते. परंतु गेल्या आठवडय़ात औरंगाबादचे पोलीस अमेयच्या घरी धडकले. एका गुन्ह्य़ाप्रकरणी त्यांनी नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडे अमेयच्या नावावर असलेले बनावट सिम कार्ड सापडले होते. ‘ंमाझ्याक डे विविध कंपन्याचे लोक चौकशीला येतात. माझे नाव व पत्त्यावर कोणीतरी सिम कार्ड घेतलेले असतेच, असे अमेयने सांगितले. माझ्याच नावावर किमान ५० मोबाइल सुरू असल्याचे अमेय म्हणाला. गेल्या चार वर्षांत माझ्या नावाने हजारो सिम कार्ड वितरित केली गेली असतील, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many sim card on one name