राज्यात भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने एकत्रित येत सत्तास्थापन केली आणि अनेक राजकीय अंदाज फोल ठरवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं असताना आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने जोरदार राजकीय टोलेबाजी झाली. या निर्णयाने फडणवीसांचं राजकीय खच्चीकरण झाल्याचा आरोपही झाला. यात आता काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश झालाय. चव्हाण यांनी मुंबई भाजपाचा आनंदोत्सव सुरू असताना फडणवीसांच्या गैरहजेरीवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “मुंबई भाजपाच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब.” आपल्या ट्वीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचा हॅशटॅग वापरत खोचक टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. भाजपाकडून मात्र देवेंद्र फडणवीस यांची पक्षनिष्ठा आणि आदर्श कार्यकर्ता यावरून कौतुक होत आहे. दुसरीकडे यावर विरोधी पक्षातील अनेक नेते यावर खोचक टीका टीपण्णी करत आहेत. तसेच फडणवीस यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेच मागे खेचल्याचा आरोप करत आहेत. विरोधी पक्षाशिवाय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आगपाखड केलीय.

ब्राह्मण महासंघाचा नेमका आक्षेप काय?

डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत आहे. पंतप्रधान पदाच्या स्पर्धामधून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचं चारित्र्य हनन करून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड रोखण्यासाठी बहुमतापेक्षा अधिक संख्येने युतीचे आमदार निवडून आणल्यानंतरही सरकार न बनविण्याचं षडयंत्र आखण्यात आलं. योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.”

“भाजपा वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला”

“आत्ता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत पोहचविले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविले. त्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. यातून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आलं,” असा आरोप गोविंद कुलकर्णी यांनी केला.

हेही वाचा : Photos : धक्कातंत्र! आधी अचानक एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी, नंतर ऐनवेळी फडणवीस उपमुख्यमंत्री, नेमकं काय घडलं?

“ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान”

“भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललं आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे,” असंही कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan tweet targeting devendra fadnavis after taking oath as deputy cm pbs
First published on: 01-07-2022 at 20:39 IST