अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील रेव्ह पार्टीप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकाकडून म्हणजेच एनसीबीकडून अटक झाल्यानंतर एनसीबीचे मुंबईमधील अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता या प्रकरणामध्ये प्रभाकर साईलने धक्कादायक खुलासे केल्यानंतर वानखेडे यांच्या भूमिकेबद्दल संशय घेतला जात आहे. मात्र या प्रकरणात अचानक प्रभाकर साईल पुढे आल्याने त्याने केलेले आरोप आणि दावे यासंदर्भात भाजपा आमदार राम कदम यांनी शंका उपस्थित केलीय. त्यांनी ट्विटरवरुन काही ट्विट करत या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ड्रग्स प्रकरणात प्रभाकरची मुलाखत करण्यामागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या महान नेताचा अदृश्य हाथ होता? कोणत्या हॉटेलमध्ये, कोणाच्या इशाराने मुलाखत झाली? ड्रग्स माफियांना वाचवणे हाच उद्देश होता का? हफ्ता वसूली निरंतर चालू रहावी म्हणून एनसीबीला बदनाम करण्याचे एक षड्यंत्र होते?”, असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. तसेच “प्रभाकरला धमकावून की लालच देऊन वसूली गेट किंवा ह्या षड्यंत्रामध्ये गुंतवले का? प्रभाकरचा वर्त्तमान बॉस मंत्रालयात कितव्या माळ्यावर आहे? मागील २२ दिवसात त्याचे मोबाईल लोकेशनसहित तो कोणाच्या संपर्कात आला याची चौकशी सीबीआयने करावी कारण जे उघडपणे ड्रग्स माफियांचे पहाडाप्रमाणे समर्थन करता आहेत त्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा करणे निरर्थक आहे,” असंही राम कदम म्हणाले आहेत.

सरकारकडून अपेक्षा नसल्यानेच “सीबीआयनेच या प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा देशातील प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल चौकशीनंतर महाराष्ट्र सरकारचे नेते या प्रकरणात एवढे रुची घेण्याचे कारण काय आणि प्रभाकरची संशयास्पद कलाटणी? या मागील सत्य देशासमोर येईल,” असंही राम कदम म्हणाले आहेत. अंततः महाराष्ट्र सरकारने हे विसरू नये की सत्यमेव जयते, असंही राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

साईलने काय दावा केलाय?
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने केलाय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलंय. आपल्या जीवाला धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी केलाय.

काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं
केपी गोसावी यांने मला मुंबईला बोलावलं. त्याने सांगितलेल्या लोकेशनवर मी पोहोचलो असता ते एनसीबीचे कार्यालय निघाले. तिथे काही वेळाने केपी गोसावी आणि एक एनसीबी अधिकारी आले, त्यांच्यापाठोपाठ समीर वानखेडे आले. हे तिघेही दोन गाड्यांमध्ये निघून गेले. काही वेळाने ते परत आले, थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि क्रूझच्या गेटवर पोहोचलो, हे सर्व २ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घडलं. दरम्यान, काही वेळाने गोसावी याने काही फोटो पाठवून त्या लोकांना मला ओळखण्यास सांगितलं. त्या १०-१२ लोकांपैकी मी केवळ एका व्यक्तीला ओळखू शकलो. काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या व्यक्तीसह एकूण १३ जणांना पकडल्याचं केपी गोसावीने सांगितल्याचा दावा साईल यांनी केलाय. तसेच त्याने पाठवलेल्या फोटोंपैकी एक मुनमुन धमेचा होती, असं साईलने सांगितलं.

१० कोऱ्या कागदावर सह्या केल्या
आर्यनला रात्री १२ वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आणलं. त्यानंतर पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलावलं. वर गेल्यानंतर साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मला कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्या. मी नकार दिला असता समीर वानखेडेंनी काहीच होणार नाही, तू सही कर असं म्हटलं. तेव्हा मी जवळपास १० कोऱ्या कागदावर सह्या केल्या, असं साईल यांनी सांगितलं.

तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता
कार्यालयात बसल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचं दिसतंय. काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली, असं साईलने सांगितलं.

व्हॉट्सअप कॉल केल्याचा दावा
त्यानंतर किरणने मला ५० लाख रुपये आणायला जायला सांगितलं. इंडियाना हॉटेलजवळ गाडीतल्या दोघांनी पिशव्या दिल्या, त्यात पैसे होते. ते पैसे घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला परत गेलो आणि पैसे गोसावीला दिले. मी पोहोचलो तेव्हा गोसावी कुठेतरी जायच्या तयारीत होता. दुसऱ्या दिवशी गोसावीने फोन करून बोलावलं आणि पैशाची पिशवी सॅमला दिली. दरम्यान, गोसावीने समीर वानखेडेंना पैशांच्या डीलसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉट्सअप कॉल केल्याचा दावा साईलने केलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kadam questions involvement of prabhakar sail in aryan khan case and his allegations against sameer wankhede scsg