विलेपार्ले येथे केले जाणार टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे संकलन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असलेला ई-कचरा पालिकेला डोकेदुखी बनला असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने विलेपार्ले येथे देशातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ सुरू केले आहे. मोबाइल, संगणक, वायर सर्किट, रेफ्रिजरेटर, धुलाई मशीन, पंखे आदी ई-कचरा या संकलन केंद्रात गोळा करण्यात येणार असून वसई येथे तो प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

कालबाह्य़ झालेल्या, जुन्या, नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महापालिकेला डोकेदुखी बनल्या होत्या. या ई-कचऱ्याचे काय करायचे, असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यावर पालिकेने आता तोडगा काढला असून विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाजवळील व्ही. जे. मार्गावर जेव्हीपीडी येथे ई-कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या ई-कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त (शहरे) डॉ. पल्लवी दराडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून पालिकेने देवनार येथे जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला असून घाटकोपर येथे हरित कचरा प्रकल्पापाठोपाठ आता ई-कचरा संकलन प्रकल्पाद्वारे मोठय़ा प्रमाणावर ब्रिकेटर्स व पॅलेटर्स या इंधनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता ई-कचरा संकलन केंद्र सुरू करून पालिकेने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या ई-कचरा संकलन केंद्राच्या कामाची जबाबदारी पालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स इकोरेको कंपनीवर सोपविली आहे.

प्रकल्प वाढविण्याचा प्रशासनाचा मानस

मोबाइल, संगणक, वायर सर्किट, रेफ्रिजरेटर, धुलाई मशीन, पंखे आदींचा ई-कचऱ्यात समावेश होते. या ई-साहित्याचे जीवनमान संपल्यानंतर त्यातून हानिकारक घटक तयार होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने पालिकेने देशातील पहिलेच ई-कचरा संकलन केंद्र सुरू केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये असे प्रकल्प पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, असे डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The countrys first e waste collection center start