डॉ. अनिल पिंपळापुरे यांचा विश्वास; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानव आणि पक्षी यांचे सहसंबंध आताचे नाही तर फार पूर्वीपासूनचे आहेत. विदर्भातील गोंड, कोरकू, माडिया, कोलाम, परधान यांच्याकडे परंपरागत पक्ष्यांचे ज्ञान आहे. त्यांच्याकडील ज्ञान आत्मसात करून डोळस पक्षी निरीक्षक तयार व्हायला हवे, या दृष्टिकोनातून ‘सीबा’(सेंट्रल इंडिया बर्ड अकादमी) ची स्थापना करण्यात आली आहे. ही अकादमी म्हणजेच पक्षी निरीक्षक, अभ्यासकांसाठी एक प्रबोधिनी ठरेल, असा विश्वास माळढोक पक्ष्याचे अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केला.  लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ.  पिंपळापुरे पुढे म्हणाले, पूर्वीच्या तुलनेत पक्षी निरीक्षकांची संख्या वाढली आहे, पण हे निरीक्षण फक्त छंदापुरते मर्यादित राहायला नको. हजार पक्षी निरीक्षक असतील तर त्यातील किमान २५ तरी चांगल्या पद्धतीने तयार व्हायला हवेत. पक्ष्याच्या निरीक्षणामागे त्याचे घरटे, त्याचा अधिवास अशा बारीकसारीक नोंदी आवश्यक आहेत. त्या कशा घ्यायच्या आणि त्यामागील शास्त्रोक्त ज्ञान या अकादमीच्या माध्यमातून दिले जाईल. या शास्त्राला पारंपरिक ज्ञानाची जोड आवश्यक आहे आणि तेच या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे. वरवर किंवा उथळपणे हा अभ्यास होणार नाही, त्यासाठी या परंपरागत ज्ञान असणाऱ्या लोकांसोबत मिसळून ते करायचे आहे. किमान वर्षभर तरी अकादमीचे पक्षीकेंद्रित व्याख्यानमाला, कार्यशाळा, चर्चासत्र, मुलाखत यावर अधिक भर असणार आहे. त्यासाठी देशभरातील पक्ष्यांवर काम करणाऱ्या लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. अकादमीच्या माध्यमातून छोटेछोटे प्रयोग करण्यात येत आहेत. शहरातल्या पक्ष्यांची स्थिती काय, यावर कुणी अभ्यास करणारा असेल तर त्यांना या अभ्यासासाठी फेलोशिप देण्यात येईल. पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना मार्ग दाखवण्याचे काम केले जाणार आहे. ही अकादमी म्हणजे त्यांच्यासाठी एक स्रोत म्हणून काम करेल. अकादमीच्या उद्घाटनालाच अनिरुद्ध बढे या पक्षी अभ्यासकाला फेलोशिप देण्यात आली आहे. बाहेर देशात पक्षी निरीक्षक, अभ्यासक झोकून देऊन काम करतात.

आपल्याकडेही त्यावर मेहनत घेतली जाते, पण त्यांच्यासारखी झोकून देऊन काम करण्याची पद्धत आता आपल्याला आत्मसात करायला हवी. पक्ष्यांचे अधिवास आणि प्रजाती अशाश्वत विकासामुळे नाश होण्याची गती वाढली आहे. त्याला आपल्यालाच आवर घालायचा आहे. आमच्या काळात पक्षी अभ्यासासाठी फारसे स्रोत नव्हते, आता ते उपलब्ध आहेत. अभ्यास, जनजागृती वाढत आहे, त्याला फक्त एक दिशा देण्याची गरज आहे. या अकादमीच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल.

पक्ष्यांचे स्थलांतरणाचे मार्ग मध्यभारतातून जातात. तरीही त्यांच्या उडण्याचा, स्थलांतरणाच्या मार्गाचा अभ्यास फारसा झालेला नाही. त्यांच्यासाठी असणारे पाणवठे दूषित झाल्यामुळे, दुष्काळामुळे आणि थंडी उशिरा पडल्यामुळे स्थलांतरणाची प्रक्रिया सुद्धा बदलत चालली आहे. शेतातील पीकपद्धतीशी स्थलांतरित पक्ष्यांची नाळ जुळलेली असते. माणसांपेक्षाही पक्ष्यांचा स्थलांतरणाचा अभ्यास अधिक असतो आणि त्यानुसारच ते स्थलांतरण करतात. त्यामुळे त्यांचा हा अभ्यास आपल्याला देखील करता यायला हवा. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक दिवं. लाडखेडकर सरांचे अशी काही तरी अकादमी असावी असे एक स्वप्न होते. या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला आता मूर्त रूप मिळाले आहे, याकडेही  डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी लक्ष वेधले.

विदर्भात सुमारे ४५० दुर्मिळ पक्षी प्रजाती

भारतात सुमारे १२०० ते १३०० दुर्मिळ पक्षी प्रजाती आहेत आणि त्यातील सुमारे १५० प्रजाती या संकटग्रस्त आहेत. विदर्भात सुमारे ४५० दुर्मिळ पक्षी प्रजाती आहेत. भारतातील संकटग्रस्त असणाऱ्या पक्षी प्रजातीतील ४० ते ४५ पक्षी प्रजाती या एकटय़ा विदर्भातील आहेत.

माळढोकची संख्या साडेतीन हजाराहून दीडशेवर

पूर्वी १०० वर्षांत दहा पक्षी प्रजाती नष्ट व्हायच्या. आता एका वर्षांत दहा पक्षी प्रजाती नष्ट होतात. ३० वर्षांपूर्वी आम्ही माळढोकचा अभ्यास करायचो तेव्हा ११ राज्यात साडेतीन हजार माळढोक होते. आता दोन राज्यात केवळ १५०च्या आसपास पक्षी आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird inspector ciba will be an academician for the researchers