व्याघ्र प्रकल्पांचे सर्व नियम धाब्यावर बसवत भाजपचे आमदार समीर मेघे यांनी त्यांचे वाहन प्रवेश नसलेल्या मार्गावरून आत घुसवले. परिणामी, शासकीय वाहने आणि जिप्सी समोर आल्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच मारामारीचा प्रकार घडला. समीर मेघे सारथ्य करीत असलेल्या वाहनात त्यांच्या बाजूला काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपाल भानसे यांचा समावेश होता. व्याघ्र प्रकल्पातील भाजप आमदारांची ही कृती चर्चेचा विषय ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोर व्याघ्र प्रकल्पात शनिवारी सहा शासकीय वाहनांचा ताफ्याने प्रवेश केला. या ताफ्यात समीर मेघे चालवत असलेले मर्सिडिज हे वाहनही होते. बोर व्याघ्र प्रकल्पातील अडेगाव गेटजवळ या सहाही शासकीय वाहनातील चार वाहने प्रवेश नसलेल्या मार्गावरून आत गेली. मनोली खरबन ते चारगाव तिप्पती मार्गावर त्यामुळे पर्यटकांची वाहने आणि ही चार वाहने समोरासमोर आली. त्यातच ताफ्यातील अन्य दोन वाहनेही आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेरच्या दोन वाहनातील गाईडने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच खाली उतरून गोंधळ घातला आणि गाईडमध्ये आपापसातच मारामारी झाली. जिप्सीतील काही पर्यटकांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही धमकावण्यात आले. विशेष म्हणजे, अवघ्या काही अंतरावरच वाघांची हालचाल होती. आमदार समीर मेघे यांनी नियम तोडले नसते तर हा प्रकार टाळता आला असता.

त्यांच्या वाहनात अडेगाव गेटचे वनपाल भानसे हेही होते. ते वाहनात असताना नियमांना सहजपणे बगल देण्यात आल्यामुळे, संबंधित प्रशासन ढासळल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा वन्यजीवतज्ज्ञांच्या वर्तुळात होती. विशेष म्हणजे, पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाचेही व्यवस्थापन आहे आणि गेल्या काही वर्षांत पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

नियम मोडले नाहीत

व्याघ्र प्रकल्पाचे नियम आम्ही मोडीत काढले नाहीत. आमच्या मागे असलेल्या वाहनातील एक व्यक्ती वाहनाबाहेर आल्यामुळे हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार समीर मेघे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla scam in tiger project