लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : ‘उद्धवजींच्या आधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना प्रत्येक गोष्टीचे भांडवल करण्याची सवय असते. अधिकाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आज टीकास्त्र सोडले.

मूर्तिजापूर येथे प्रचार सभेसाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दात समाचार घेतला. वणी येथे प्रचार सभेसाठी आले असता उद्धव ठाकरे यांची निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बॅग तपासणी केली गेली होती.

आणखी वाचा-योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी त्याची चित्रफित तयार करून तीव्र रोष व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या देखील बॅगा तपासा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘माझी बॅग उद्धव ठाकरे यांच्या अगोदर तपासल्या गेली. त्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला आहे. आजही मी येथे उतरलो, तर माझी बॅग तपासण्यात आली आहे. सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचे भांडवल करण्याची सवय असते. निवडणूक काळात पोलीस विभागाचे हे काम आहे. वर्षानुवर्षे हे चालत आलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बॅग तपासली, माझी तपासली, सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत.’

आणखी वाचा-डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन

अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना बोलणे. त्यांच्यावर व्यंग करणे हे अतिशय चूक आहे. ठिक आहे, आपण मोठे आहोत. पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळाला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले. आता त्यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले राहील.

‘आम्ही मोठे स्वप्न बघतो’

विदर्भात नदीजोड प्रकल्पातून ५५० कि.मी.ची नवीन नदी तयार केली जात आहे. ८८ हजार कोटीतून १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे काम होईल. त्यामुळे प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. आम्ही स्वप्न मोठी पाहतो व ती पूर्ण करतो, असे देवेंद्र फडणवीस मूर्तिजापूर येथे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking ppd 88 mrj