‘लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी २ डिसेंबरपासून

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित राज्यस्तरीय  ‘लोकांकिका’ स्पर्धेसाठी शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. विदर्भातील महाविद्यालयांसाठी लोकांकिकेची प्राथमिक फेरी येत्या २ आणि ३ डिसेंबरला नागपुरातील बोले पेट्रोल पंपाजवळच्या विनोबा विचार केंद्रात होत आहे. दरवर्षीच महाविद्यालयांमध्ये स्पर्धेसाठी चढाओढ सुरू असते. त्यासाठी चांगले नाटक निवडणे, चांगल्या लेखकाकडून संहिता लिहून घेणे, या साऱ्या गोष्टीची गोळाबेरीच करून नाटक उभे केले जाते. या क्रमात यंदाही विद्यार्थी महाविद्यालय, मैदान, गच्ची, एखाद्या मित्राचे घर अशा मिळेल त्या ठिकाणी तालीम करीत आहेत.

अभ्यास, परीक्षा आणि घरची कामे या सर्व गोष्टींचे योग्य नियोजन करून विद्यार्थी लोकांकिकेच्या तयारीत गुंतले आहेत.

आमची तयारी फारच जोमात सुरू आहे. कारण काहीही करून आम्हाला स्पध्रेत बाजी मारायची आहे. नाटकासाठी आम्ही पुरेसा वेळ देत आहोत. आमच्या परीक्षाही आटोपल्या आहेत. शंकरनगरातील एका मित्राच्या घरी आम्ही सराव करीत आहोत.

– अनिरुद्ध शिंगरू, विद्यार्थी, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय.

पहिलेच वर्ष, पहिलाच अनुभव

आमचे हे पहिलेच वर्ष आहे. नवीनच अनुभव आहे. त्यामुळे १० दिवसांपूर्वीच आम्ही सराव सुरू केला. लोकांकिकेबाबत आम्हाला एका मित्राने सांगितले. त्यानेच आम्हाला नाटकाच्या संहितेचा विषय सांगितला. त्या विषयाला धरून आमच्या मनात ज्या ज्या गोष्टी आल्या त्या आम्ही संवादरूपाने लिहिल्या आणि नाटक बसवले. महाविद्यालयात आम्ही नाटकासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे मागवली.

– सागर डेंगे, विद्यार्थी, राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय.

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पावर्ड बाय इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहात आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students preparations for establishing one act play