थकबाकी वसुलीसाठी वीजजोडणी खंडित करण्याच्या मोहिमेला वेग

‘महावितरण’ची आर्थिक घडी विस्कटल्याने आणि अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

देयकांचा भरणा करण्याचे ‘महावितरण’चे आवाहन

नाशिक : ‘महावितरण’ची आर्थिक घडी विस्कटल्याने आणि अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीचा तत्परतेने भरणा करावा, चालू वीज देयक नियमित भरावे. ग्राहकांच्या सहकार्याच्या बळावरच ‘महावितरण’ला अभूतपूर्व आर्थिक संकटातून उभारी घेणे शक्य होणार आहे. अन्यथा कंपनी बंद होण्यास वेळ लागणार नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.

वीज देयक म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. विजेचा वापर केला नाही तर केवळ स्थिर आकाराशिवाय एकही जादा पैसा भरावा लागत नाही. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या विजेचा वापर आपणाकडून होत असताना त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीज देयक आहे. हे वीजदेयक दरमहा नियमित भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्वाने वीज सेवा देणाऱ्या ‘महावितरण’वर एक ग्राहक म्हणून वीज खरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज आणि त्याच्या हप्तय़ांचे सद्यस्थितीत कोटय़वधी रूपयांचे दायित्व असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.

‘महावितरण’च्या वीज ग्राहकांकडे ७१ हजार ५७८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे ‘महावितरण’च्या अस्तित्वाचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. घरगुती, उद्योग, शेती, व्यवसाय, सार्वजनिक सेवा आदींसाठी वापरलेल्या विजेसाठी नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे देयकांची आकारणी केली जाते. प्रचंड वीज देयकांची थकबाकी व विविध देणींच्या दायित्वाचे ओझे असल्याने सद्यस्थितीत देयकांचा थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वीज देयक नियमितपणे भरणे ग्राहकांकडून होताना सकृतदर्शनी दिसून येत नाही. कर भरणा, अन्य आवश्यक खर्च वेळेत केले जातात. मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की अतिशय मूलभूत गरज असलेल्या विजेचे देयक भरण्यास मात्र ग्राहक प्राधान्य देत नाही. शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या वीज देयकांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी मूळ थकबाकीमधील रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत देण्याच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accelerate electricity recovery arrears ysh

ताज्या बातम्या