वाळू माफियांचा हात असल्याचा संशय
वाळू तस्करी रोखण्यासाठी दुचाकीने निघालेल्या तिघा तलाठय़ांना पाठीमागून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने धडक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरूध्द येथील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसली तरी वाळू माफियांचा त्यात हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तहसीलदार सुरेश कोळी यांनी अरूण दाढे, पी. डी. खैरनार व नारायण गायके या तिघा तलाठय़ांना बेकायदा वाळू पकडण्यासाठीच्या मोहिमेवर जाण्यासाठी बोलावले होते. मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हे तिघे जण दोन दुचाकींवरून तहसील कार्यालयाकडे जात असतांना मसगा महाविद्यालयाजवळ पाठीमागून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने त्यांना धडक दिली. त्यात हे तिघे तलाठी जखमी झाले असतांना कारमधील संशयित पसार झाले. नंतर जमलेल्या लोकांच्या मदतीने तिघांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी रात्रीच्या सुमारास कॅम्प रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे गोसावी नावाच्या मंडल अधिकाऱ्याचा बळी गेला होता. हे गोसावी देखील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बोलावण्यावरून वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी घरून निघाले होते. तिघा तलाठय़ांच्या वाहनांना धडक मारण्याच्या ताज्या प्रकरणावरून गोसावी प्रकरणाच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या असून कारवाई करण्यासाठी कुणी धजावू नये आणि आपली दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने वाळू तस्करांचेच हे कृत्य असावे असा कयास लावला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to kill three talati