१८ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन; शनिवारी आणि रविवारी पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असून पक्ष्यांचे थवे पर्यटकांना खुणावत आहेत. सध्या अभयारण्यात १८ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले असून त्यात फ्लेमिंगोचीच संख्या लक्षणीय आहे.

जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत असतामा नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन वाढले आहे. त्यात विदेशी पक्ष्यांचाही समावेश आहे. अभयारण्य परिसरात सात ठिकाणी केलेल्या पक्षी निरीक्षणात झाडांवरील आणि गवताळ भागातील असे १३,५६७ पाणपक्षी तसेच तीन हजार ४६ गवताळ पक्षी याप्रमाणे एकूण १६,६१३ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये फ्लेमिंगो, ऑस्प्रेन, कॉमन क्रेन, मार्श हरियर, मॉन्टेग्यु हरियर आदी पक्षी आढळून आले. यामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. थंडीचे प्रमाण ज्याप्रमाणे वाढत जाईल, तशी पक्ष्यांची संख्या दिवसागणिक वाढेल.

दरम्यान, करोनाची लाट ओसरल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी अभयारण्य पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी खुले झाले आहे. सध्या दिवाळी सुट्टी सुरू असून शनिवार तसेच रविवारी पर्यटकांचा प्रतिसाद अधिक लाभत आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक पक्षीप्रेमींनी भेट दिली आहे. पक्षीप्रेमींना येथे येणाऱ्या वेगवेगळय़ा पक्ष्यांची माहिती व्हावी यासाठी दृकश्राव्य चित्रफितीचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय गावातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिक मार्गदर्शकांना ३०० रुपये तासिकेवर मानधन देत पाच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. बाहेरून येणारे पर्यटक तसेच निसर्गप्रेमींची जेवणाची सोयही करण्यात आली आहे. निसर्ग परिचय केंद्राच्या माध्यमातूनही अभयारण्यात येणाऱ्यांना माहिती देण्यात येत असल्याचे नांदुरमध्यमेश्वर वनपरीक्षक अधिकारी एस. एस. देवकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ पक्षीप्रेमींमुळे अडचण

अभयारण्य परिसरात पक्ष्यांसह अन्य वनसंपदेचा अभ्यास करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ज्येष्ठ पक्षीप्रेमी येतात. वास्तविक अभयारण्य परिसरात येण्यासाठी वयाची अट घालण्यात आली आहे. पक्षीप्रेमींच्या अभ्यासात अडथळा नको म्हणून अभयारण्य व्यवस्थापनाकडूनही आडकाठी करण्यात येत नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase flamingos nandur madhmeshwar sanctuary ysh