परशुराम साईखेडकर नाटय़गृहात व्यक्तिचित्रे पाहता येणार
शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान देऊन जागतिक पातळीवर नाशिकचे वैभव वृद्धिंगत करणाऱ्या आणि नाशिक ही जन्मभूमी तसेच कर्मभूमी असलेल्या पाच युगपुरुषांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्त आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी या पाचही महान व्यक्तींची चित्रे नाशिककरांसमोर साकारून त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिनव पद्धतीने मानवंदना चित्रकलेतून दिली आहे. ही नावीन्यपूर्ण पाचही व्यक्तिचित्रे नाशिककरांना शुक्रवारी परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित ‘पंचप्राण’ या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी नाटय़गृहाच्या परिसरात सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत पाहता येणार आहेत.
स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका घेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्ञानपीठप्राप्त कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, भारतातील चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, प्रसिद्ध साहित्यिक वसंत कानेटकर तसेच महान संगीतकार आणि गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या पाचही व्यक्तींच्या जन्मशताब्दीनिमित्त चित्रकार राजेश सावंत यांनी त्यांची अत्यंत वास्तववादी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.
नाशिकमधील ललित कलाकारांच्या जनस्थान ग्रुपच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात ‘रंगभान’ हे चित्र-शिल्प समूह प्रदर्शन नुकतेच झाले. या प्रदर्शनात चित्रकार राजेश सावंत यांनी रसिकांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे नाशिकच्या पंचप्राणांची व्यक्तिचित्रे रेखाटली.
व्यक्तिचित्रांच्या पेन्सिल रेखाटनापासून, तर जलरंगाची हॅन्डमेड पेपरवरील मुक्त वावरातून पाझरण सर्वाना आकर्षित करून गेली. ही व्यक्तिचित्रे पाहण्यासाठी रसिकांनी शुक्रवारी सायंकाळी प. सा. नाटय़गृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जनस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.