आंदोलनात विरोधकांपेक्षा शिवसेना आघाडीवर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूर खरेदी प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचे तीव्र पडसाद शहरासह ग्रामीण भागात उमटले. दानवेंच्या विधानाचा विरोधी पक्षांऐवजी मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार समाचार घेतला. विरोधी पक्ष काँग्रेसने आंदोलन केले नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी माजी आमदार ए. टी. पवार यांच्या अंत्यविधीस उपस्थित असल्याने या पक्षाने आंदोलन केले नसल्याचे सांगण्यात आले.

जालना येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्दांचा वापर केला. प्रचंड उत्पादनामुळे तूर खरेदीचे संकट उभे ठाकले आहे. सरकारने आतापर्यंत चार लाख टन तूर खरेदी केली असून आणखी एक लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे. असे असताना या मुद्दय़ावरून नाहक रडले जात असल्याचे सांगताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त विधानाने विरोधकांऐवजी मित्रपक्षांना आयते कोलीत मिळाले. संबंधितांनी सकाळपासून दानवेंच्या विधानाचा आपल्या पद्धतीने समाचार घेण्यास सुरुवात केली. त्याची सुरुवात शहरातील शिवसेना कार्यालयापासून झाली. शालिमार चौकात संतप्त शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आगामी काळात राज्यातील शेतकरी दानवे व भाजपला धडा शिकवतील, असा इशारा बोरस्ते यांनी दिला.

शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने विंचूर चौफुली येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. या वेळी संभाजी पवार, झुंजारराव देशमुख, बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे उपस्थित होते.

शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी सुखी तर जनता सुखी. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा आला तर बाजारात पैसा फिरेल. उद्योगधंदे वाढीस लागतील याचे भान दानवेंसारख्या नेत्याला राहिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सटाणा शहरात शिवसैनिकांनी साक्री-शिर्डी महामार्ग अर्धा तास रोखून धरला. दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्यांचा निषेध करण्यात आला. सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही दानवेंच्या विरोधात मैदानात उतरली. दानवेंच्या विधानावरून शिवसेना आक्रमक झाली असताना विरोधी पक्ष काँग्रेसच्या गोटात शांतता होती. या पक्षातर्फे दानवेंविरोधात कोणतेही आंदोलन केले गेले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी ए. टी. पवार यांच्या अंत्यविधीत व्यस्त होते. त्यामुळे पक्षाकडून आंदोलन केले गेले नसल्याचे सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena protest on raosaheb danve statement on toor dal