कामोठे वसाहतीमधील जुही रेसीडेन्सी या इमारतीत रखवालदार आणि रहिवाशांनी पकडलेला संशयित  चोर हा वाशी येथील एका इमारतीचा रखवालदार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयिताला शनिवारी पहाटे ‘जुही रेसीडेन्सी’च्या आठव्या मजल्यावरील सुरक्षा मनोऱ्यातून  अग्निशमन दल व पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारीनंतर त्याला चोरीचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्य़ाखाली अटक करण्यात आली; मात्र चौकशीअंती तो वाशी येथील एका इमारतीतील रखावलदार असल्याचे उघड झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेक्टर ५ मधील जुही रेसीडेन्सी आहे. या इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास एक चोर शिरल्याचे येथील रखवालदारांनी पाहिले. त्यानंतर या संशयितांच्या मागे रखवालदार धावत गेले. त्यामुळे संशयित  इमारतीतील रखवालदारांच्या खोलीत  शिरला.

त्यानंतर रखवालदाराने संशयिताला पकडून खोलीतच कोंडून ठेवले. थोडय़ा वेळेने याची माहिती त्याने रहिवाशांना दिली; मात्र  रहिवाशांनी तेथे येऊन पाहिल्यानंतर त्या खोलीत संशयित नसल्याचे आढळले. त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. पहाटे पाच वाजेपर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. संशयित खोलीतून बाहेर पडून   आठव्या मजल्यावरील सुरक्षा रक्षकांसाठी  बांधलेल्या मनोऱ्यावर  झोपल्याचे आढळले. याची माहिती  पोलिसांना देण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव उमेश तिवारी आहे. उमेश हा काही दिवसांपूर्वी रोडपाली येथील एका इमारतीचा रखवालदार होता. कामावर असताना झोपणे आणि मद्यपान करीत असल्यामुळे उमेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो  वाशी रेल्वेस्थानक परिसरातील एका इमारतीत कामाला होता.

शनिवारी रात्री उमेशने गांजा व भांगेच्या गोळ्या खाल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. उमेश हा तुर्भे येथून वाशीला जाण्यासाठी निघाला होता; परंतु चुकीचा पत्ता सांगितल्याने रिक्षाचालकाने त्याला कामोठे येथील जुही रेसीडेन्सीसमोर सोडले.

उमेशला जुही रेसीडेन्सी ही इमारत वाशीमधील तो काम करत असलेल्या इमारतीप्रमाणे वाटल्यामुळे तो थेट रखवालदाराच्या खोलीत गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai crime news