रेम्युलस याने स्थापन केलेल्या रोमन राज्यात सात राजे झाले. राज्याच्या स्थापनेपासूनच सर्व राजांनी आपल्या राज्याचा विकास करण्याचे प्रयत्न केले. टय़ूलस या नास्तिक आणि युद्धप्रिय राजाने अनेक लढाया जिंकून मोठा राज्यविस्तार केला, पराभूत जनतेला रोममध्ये आणून गुलाम केले. याच्या अशांत कारकीर्दीत प्लेगचा मोठा प्रादुर्भाव झाला. टय़ूलस नास्तिक असल्यामुळेच प्लेग आणि त्यापाठोपाठ रोममध्ये मोठी आग लागली असे लोकांचे म्हणणे हेते. टय़ूलस स्वत:ही या आगीत मरण पावला. अँकस मारिकस या शांतताप्रिय धार्मिक राजाने पहिला तुरुंग बांधला. रोमभोवती कोट बांधून टायबर नदीवर पक्का पूल, पहिले बंदर, पहिले मिठागर तयार केले. रोमन राजा तारक्विनीयसने सिनेटर्सची संख्या ३०० करून मोठमोठी बांधकामे केली, रथांच्या शर्यतीसाठी ‘सर्कस मॅक्झिमस’ हे प्रचंड मोठे स्टेडियम बांधले, रोमन क्रीडापटूंना उत्तेजन दिले. त्याने रोमनांची देवता ज्युपिटरचे भव्य मंदिर आणि भव्य प्रासाद बांधले. पुढे आलेला रोमन राजा सíव्हयस टुलियस याने रोमच्या सर्व सात टेकडय़ांभोवती संरक्षक कोट उभा केला. सíव्हयसने रोमन राज्यात केलेली जनगणना ही जगातली पहिली जनगणना! या जनगणनेच्या आधाराने त्याने रोमन राज्यासाठी ‘सेंच्युरी असेंब्ली’ आणि ‘ट्रायबल असेंब्ली’ अशी दोन विधिमंडळे तयार केली. नागरिकांच्या आíथक परिस्थितीवर मतदानाचे अधिकार त्यांना दिले होते. इ.स. पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीस रोमचे मूळ रहिवासी एट्रस्कन आणि सॅबाईन्स या दोन जमातींमधील एकोपा संपून त्यांच्यात वैमनस्य झाले. तारक्विनीयस सुपर्बस या एट्रस्कन राजाने सत्तेवर आल्यावर आपल्या जमातीचे वर्चस्व रोमवर राहण्यासाठी दुसऱ्या जमातींचा छळवाद सुरू केला, त्यांची मंदिरे उद्ध्वस्त केली. राज्यात दंगे, विश्वासघात, लूटमार यांचे सत्र सुरू होऊन अनागोंदी माजली. राजा तारक्विनीयस सुपर्बचा इ.स. पूर्व ५०९ मध्ये मृत्यू झाल्यावर राजेशाहीला विटलेल्या सिनेटने राजेशाही परत न आणता प्रजासत्ताक राज्य रोमवर आणण्याचा निर्णय घेतला.
– सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल – अगारू / कृष्णगुरू वृक्ष
मध्यंतरी वर्तमानपत्रात ‘कृष्णगुरू’ हा दुर्मीळ वृक्ष मुंबईतील शीवच्या टेकडीवर आहे असे वाचण्यात आले. अगारू किंवा कृष्णगुरू अशी नावे असलेल्या या वृक्षाला इंग्रजीत एलोवूड, ईगलवूड अशी नावे आहेत. याचे वनस्पती शास्त्रीय नाव ‘अक्वीलारीया अगलोचा’ असे आहे.
हा वृक्ष भारतात पूर्व हिमालयीन भागात, मेघालय, आसाम, नागालँड, मणिपूर व त्रिपुरा या ठिकाणी आढळतो. त्याचप्रमाणे बांगलादेश, म्यानमार, येथेही तो नसíगकरीत्या वाढतो. या वृक्षास दमट हवामान, १८०० ते ३००० मिलिमीटर वार्षकि पाऊस आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. चांगला सरळसोट वाढणारा हा सदाहरित वृक्ष २० ते २५ मीटर उंचीपर्यंत वाढतो. पाने लांबसर, साधारण गोलाकार आणि चकचकीत असतात. फुले बारीक, हिरवट रंगाची, तर फळे पिवळट रंगाची असतात.
आगार ऑइल किंवा आगारवूड हे या वृक्षाच्या खोडात सापडते. त्यासाठी अगोदर या वृक्षावर परजीवी कवकाचा शिरकाव होणे आवश्यक असते. अशा प्रकारची क्रिया एस्कोमायसीटीस वर्गातील एक कवक फिओक्रेमोनीयम पॅरासीटीकाद्वारे होते. जुन्या वृक्षाचा संक्रमित भाग गडद रंगाचा होतो आणि स्राव सुरू होतो. म्हणजेच आपल्याला मिळणारे द्रव हे एक रोगजनिक उत्पादन आहे. नसíगक अवस्थेत फक्त ७% वृक्षावर कवकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कृत्रिमरीत्या जुन्या खोडाच्या वृक्षावर अशी क्रिया करून व्यापारी स्तरावर उत्पादन केले जाते.
रेझीनस हार्टवूडचा उपयोग सुगंधासाठी केला जातो. जतीसांची आणि भोलासांची असे दोन प्रकार या वृक्षांमध्ये आढळून येतात. पहिला प्रकार हा व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचा आहे, तर दुसरा शीघ्र उगवणारा, पण कमी उत्पन्न देणारा आहे.
या वृक्षाचा उपयोग धूप व अगरबत्ती तयार करण्यासाठी होतो. अगारू शक्तिवर्धक, हृदयाला मजबुती देणारे, गर्भनिरोधक, अशा औषधांमध्ये वापरले जाते. अगारूंचा उपयोग अनेक प्रकारच्या त्वचारोगासाठी होतो. अगारूंची पावडर मधातून घेतल्यास खोकला बरा होतो व उचकी थांबते. त्याचप्रमाणे नाक, कान, घसा विकारांवर अगारूचा उपयोग होतो. प्रतिबंधित वितरणामुळे हा वृक्ष दुर्मीळ होत चालला आहे.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org