बेंजामिन विल्यम हॉर्निमन हे ब्रिटिश पत्रकार आणि ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या मुंबईतल्या दैनिक वर्तमानपत्राचे संपादक, भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कत्रे म्हणून ओळखले जातात. जन्माने ब्रिटिश असूनही बेंजामिन यांनी त्यांचे शस्त्र म्हणजे त्यांची लेखणी आणि वृत्तपत्र ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध उपसले हे विशेष. इंग्लंडच्या ससेक्स परगाण्यात १८७३ साली जन्मलेल्या बेंजामिनचे शिक्षण पोर्टस्माऊथ ग्रामर स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी त्यांच्या आवडीच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. डेली क्रॉनिकल, मँचेस्टर गार्डियन वगैरे वृत्तपत्रांत कार्यरत असतानाच, ब्रिटिश नौदलात नोकरी करणाऱ्या त्यांच्या वडिलांची बदली भारतात झाली. भारतात आलेल्या बेंजामिनना १९०६ साली कलकत्त्यातल्या प्रसिद्ध ‘स्टेट्समन’ या वृत्तपत्रात वृत्तसंपादक पद मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९१३ साली बेंजामिन मुंबईच्या ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक म्हणून रुजू झाले. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे फिरोजशाह मेहता यांनी सुरू केलेले वृत्तपत्र. क्रॉनिकलमध्ये हॉर्निमन आल्यावर ते ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध अतिशय तिखट शब्दांत आपली लेखणी चालवू लागले. हे वृत्तपत्र महात्मा गांधींच्या चळवळीचे मुखपत्रच बनले. जलियाँवाला बाग हत्याकांडाची छायाचित्रे गुप्तपणे मिळवून बेंजामिन यांनी छायाचित्रांसह विस्तृत बातमी क्रॉनिकलमध्ये व लंडनच्या हेराल्ड या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश सरकारने ‘बॉम्बे क्रॉनिकल’वर बंदी घालून बेंजामिनची परतपाठवणी लंडनला केली. १९२५ साली भारतात परत येऊन पुढची चार वर्षे क्रॉनिकलचे काम पाहिल्यावर बेंजामिन यांनी, स्वतचे ‘इंडियन नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र १२ वर्षे चालविले. १९४१ साली त्यांनी रूसी करंजियांसह ‘ब्लिट्झ’ हे साप्ताहिक सुरू केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही बेंजामिन क्रियाशील होते. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी होम रूल लीगच्या उपाध्यक्षपदी काम केले. ‘रौलट अ‍ॅक्ट’च्या विरोधात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळीचे ते उपाध्यक्ष होते. १९४८ साली त्यांचे निधन झाले. मुंबईच्या प्रसिद्ध हॉर्निमन सर्कलचे नाव बेंजामिन हॉर्निमनवरूनच, स्वातंत्र्योत्तर काळात दिलेले आहे!

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British journalists benjamin william horniman