बगदादी ज्यू समाजातले कलकत्ता निवासी लष्करी सेनाधिकारी जे.एफ.आर. जेकब दुसऱ्या महायुद्ध समाप्तीनंतर इंग्लंडमध्ये तोफदलाचे उच्च शिक्षण घेऊन परत आले. १९६३ मध्ये त्यांना ब्रिगेडियरपदी बढती मिळाली. १९६५ सालच्या भारत-पाक युद्धामध्ये राजस्थानातील बाराव्या इन्फ्रंट्री डिव्हिजनचे ते प्रमुख होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापुढे त्यांच्या चोख लष्करी प्रशासनामुळे जेकबना भराभर बढत्या मिळत गेल्या. १९६७ मध्ये ते मेजर जनरल झाले. तत्कालीन जनरल सॅम माणेक शॉ यांनी जेकब यांना १९६९ साली ईस्टर्न कमांडचे प्रमुख या पदावर बढती दिली. त्या काळातल्या ईशान्य भारतातल्या वाढत्या बंडखोरीवर नियंत्रण ठेवण्याची कामगिरी जेकब यांच्यावर सोपविण्यात आली. पुढे १९७१ साली पाकिस्तान लष्कराने ऑपरेशन सर्चलाइट या नावाची मोहीम काढून कुरापत काढल्यामुळे पूर्व पाकिस्तानमधले एक कोटीहून अधिक घुसखोर निर्वासित भारतीय प्रदेशात शिरले. ही समस्या निपटण्याची कामगिरी जेकब यांच्यावर सोपविण्यात आली. यासाठी ‘वॉर ऑफ मूव्हमेंट’ या मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. जेकबनी तयार केलेली योजना ढाका घेऊन पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तानापासून अलग तोडण्याची होती. सीमेवरून आत जाताना पाकिस्तानी लष्करी तळ टाळून तीन मोठय़ा नद्यांच्या दलदलीच्या खोऱ्यांमधून ढाक्यापर्यंत पोहोचायचे आणि ढाक्यात लढून ते घ्यायचे अशी ही योजना इतर सेनाधिकाऱ्यांच्या मते यशस्वी होणार नाही असे होते.

जेकबनी मात्र आपल्या योजनेवर खंबीर राहून ढाक्याजवळ लढत दिली. पाकिस्तानी लष्कराचा पराभव होऊन पाक लेफ्ट.जनरल ए.के.नियाझी यांची बिनशर्त शरणागती जेकब यांनी स्वीकारली. जेकब यांची योजना हे युद्ध तीन आठवडे चालेल अशी होती, पण प्रत्यक्षात पंधरा दिवसांतच कारवाई संपली.  निवृत्तीनंतर जेकब भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले. त्यांनी सरकारचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिले. पुढे सरकारने जेकब यांची नियुक्ती गोवा आणि पंजाबचे राज्यपाल म्हणूनही केली. २०१६ साली वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jfr jacob