प्राचार्य किशोर पवार
सागरात सर्वच अपृष्ठवंशीय प्राणीसंघांतील सजीव वास्तव्य करतात. त्यातील आधाराशी चिकटलेले स्पंज प्राणी, रंध्री संघात समाविष्ट केले आहेत. त्यांच्या अंगावर अगणित रंध्रे (छिद्रे) असतात. विविध आकारा-प्रकारांचे स्पंज निरनिराळय़ा रंगांचे असून आकर्षक दिसतात. एखादी प्रजाती सोडल्यास बहुतेक सर्व सागरी अधिवासात आढळतात. सागर परिसंस्थांत त्यांचे महत्त्व मोठे आहे.
स्पंजाच्या शरीरावर इतर अनेक प्राणी आधारासाठी किंवा निवाऱ्यासाठी अवलंबून असतात. क्लायोना नावाची प्रजाती प्रवाळांना, शिंपल्यांना आणि बारनॅक्लसना पोखरून काढते. हायड्रोएड हे आंतरगुही आणि संधिपाद बारनॅक्लस त्यांच्यावर वाढतात. विविध सागर कृमी, भंगुर तारा (ब्रिटल स्टार) यांसारखे कंटकीचर्मी आणि पिस्तूल कोळंबी स्पंजांच्या आतच राहतात. ‘व्हीनस फ्लॉवर बास्केट’ या खोल समुद्रातील स्पंज प्रजातीमध्ये ‘स्पाँजीकोला’ ही कोळंबीची प्रजाती लहान वयातच शिरून बसते. नंतर पूर्ण वाढ झाल्यावर इच्छा असूनही त्यांना बाहेर पडता येत नाही. कारण त्यांच्या प्रौढ शरीराच्या मानाने स्पंजची रंध्रे छोटी असतात. मोठय़ा लॉगरहेड स्पंज प्रजातीत १६ हजार ३५२ पिस्तूल कोलंब्या सापडल्याची नोंद आहे. काही प्रजातींचे जिवाणू, सूक्ष्म शैवाल व बुरशी यांच्याशी असलेले स्पंजाचे सहजीवन एकमेकांना उपकारक ठरते. यांच्या शरीरातील सिलिकाच्या व कॅल्शिअमच्या कंकालामुळे ते खरखरीत असतात. म्हणूनच ताम्रयुगात चार हजार वर्षांपूर्वीदेखील माणूस त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्पंज वापरत असे. आता स्पंज कृत्रिमरीत्या बनवतात.
स्पंज ७२ हजार वेळा त्यांच्या शरीराच्या आकारमानाचे पाणी दर दिवशी सातत्याने गाळण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या आधाराने राहणाऱ्या इतर सागरी प्राण्यांच्या अन्नाची आयतीच सोय होते. स्पंज हे काही समुद्री प्राण्यांचे अन्न आहे. परंतु त्याची चव आणि वास यामुळे ते विशेष आवडीचे खाद्य ठरत नाही. तरीही ‘हॉक बिल्ड’ कासवाच्या अन्नात ८० टक्के स्पंज असतात. समुद्री गोगलगाय मात्र यांचाच आहार घेतात. काही स्पंज विषारी पदार्थ सोडतात. त्यामुळे भक्षक त्यांना खाणे टाळतो. स्पंजांच्या काही प्रजातींच्या जैवक्रियाशील पदार्थापासून जंतुनाशक, विषाणूनाशक, बुरशीनाशक, मलेरिया प्रतिबंधक, कर्करोग व हृदयविकारावर उपयुक्त अशी औषधे तयार केली जातात. वातावरण बदल, प्रदूषण, प्रवाळ ब्लीचिंग व मानवाचा सागर परिसंस्थेतील हस्तक्षेप यामुळे या प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.