इसवी सन १६८६ साली सर एडमंड हॅली या इंग्रज खगोलशास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की, भारतीय मान्सूनची निर्मिती भारतासहित युरेशियाचा विस्तृत खंड आणि भारताच्या दक्षिणेस असलेल्या हिंदी महासागरामुळे होते. जमीन आणि सागर यांच्यातील तापमानाच्या तफावतीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते आणि ऋतूनुसार वाऱ्यांची दिशा बदलते. सारांश, मान्सून म्हणजे वर्षांत दोनदा दिशा बदलणारे वारे. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा भारतावर मान्सूनचे वारे नैर्ऋत्येकडून येतात आणि दक्षिण गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ते उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. खरे तर पावसाळा हा एक स्वतंत्र ऋतू नाही, तर तो उन्हाळय़ाचाच एक भाग आहे. पण असे होते की, उन्हाळय़ात नैर्ऋत्य मान्सूनचे वारे हिंदी महासागरावरून मोठय़ा प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि भारतावर सर्वत्र पाऊस पडतो. त्यामुळे मान्सूनचा संबंध पावसाशी जोडला जातो.
हिंदी महासागराची व्याप्ती खूप मोठी आहे. तो भारताच्या दक्षिणेकडे थेट अंटाक्र्टिकाला जाऊन भिडतो. त्याच्या पश्चिमेकडे आफ्रिका खंड तर पूर्वेकडे इंडोनेशिया आहे. अर्थातच त्याचे तापमान सर्वत्र सारखे नसणार. अलीकडच्या काळात हे दिसून आले आहे की, हिंदी महासागराचा पश्चिमेकडचा भाग जेव्हा त्याच्या पूर्वेकडच्या भागापेक्षा अधिक उष्ण असतो तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस चांगला पडतो. पण कधी कधी परिस्थिती उलट असते, म्हणजे हिंदी महासागराचा पश्चिमेकडचा भाग थंड असतो आणि त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम होतो. तापमानाची ही तुलनात्मक स्थिती आलटून पालटून बदलत राहत असल्यामुळे तिला इंग्रजीत ‘इंडियन ओशन डायपोल’ म्हणतात. मान्सूनच्या पर्जन्यमानाशी आणि त्याच्या पूर्वानुमानाशी तिचा संबंध महत्त्वाचा ठरला आहे.
याव्यतिरिक्त प्रशांत महासागराच्या तापमानाचाही भारतीय मॉन्सूनशी जवळचा संबंध आहे. जेव्हा पूर्व प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या परिस्थितीला एल नीनो म्हणतात. तर ते जेव्हा सरासरीपेक्षा कमी असते तेव्हा त्या परिस्थितीला ला नीना म्हणतात. एल नीनोचा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अनुभव आहे, पण नेहमीच तसे होत नाही. ला नीना भारतीय मान्सूनसाठी फायदेशीर मानला जातो. मागील तीन वर्षे ला नीना परिस्थिती सातत्याने राहिली आणि त्याबरोबर भारतीय मान्सूनचे पर्जन्यमानही चांगले राहिले.