ताक करून लोणी काढणे, लोणी काढल्यावर लोणी कढवणे आणि मग लोणी कढवल्यावर त्याचे तूप तयार करणे ही प्रक्रिया खूप परिश्रम करून साध्य होणारी असते. लोणी उकळल्याशिवाय तूप मिळत नाही, हे खरे आहे पण घुसळण्याच्या प्रक्रियेपेक्षा उकळण्याची प्रक्रिया सोपी असते. त्याला कमी श्रम पडतात. घुसळणाऱ्याचे श्रम फारसे गृहीत धरले जात नाहीत. लोणी कढवणारा तेवढा लक्षात राहतो आणि तोच बहुदा सारे श्रेय लाटतो. कमी श्रम करतो त्याला लाभ जास्त! ही येथील परंपरेनुसार चालत आलेली समाजव्यवस्था आहे. त्यावर या म्हणीने नेमके बोट ठेवलेले आहे. वर्तमान स्थितीचे निरीक्षण आपण केले, तर आपल्याला या म्हणीतील तथ्य ताबडतोब लक्षात येईल. इतकी ही मार्मिक म्हण आहे. आणि बहुतेक क्षेत्रांत हीच परिस्थिती आहे, हे कटू सत्यही आपल्या निदर्शनास येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदाहरणार्थ शेतीचा व्यवसायच बघा ना! शेतात राबणारे हात राब राब राबून धान्य पिकवतात, पीक काढतात पण त्याला दाम कमी मिळतो आणि जास्तीत जास्त कमाई होते ती तो माल बाजारात नेऊन विकणाऱ्या दलालाची. किंवा रस्ते बांधणारे मजूर! उन्हातान्हात काम करून निढळाचा घाम गाळून दिवसभर कष्ट उपसतात पण जास्तीत जास्त लाभ उकळतो तो कंत्राटदारच! विचार केला तर अशी अनेक उदाहरणे आढळतील.

राबणारे खरे हात असेच दुर्लक्षित राहतात आणि फुकट श्रेय लुटणारे बरेच हात आपल्याला नेहेमीच पाहायला मिळतात. आपण अनेक चळवळी पाहिल्या आहेत तिथेही हीच स्थिती दिसते. त्या चळवळींसाठी अहोरात्र कष्ट करून जिवावर उदार होऊन काम करणारे अनेक लोक अंधारात राहतात. पण त्यांच्या परिश्रमांवर मोठे होणारे मात्र मस्तपैकी मिरवून घेताना दिसतात. हीच जगाची रीत आहे. ‘ताक घुसळणाऱ्यापेक्षा उकळणाऱ्याची चैन आहे!’

डॉ. माधवी वैद्य

madhavivaidya@ymail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language learning marathi useful phrases sentences in marathi zws