– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जबरदस्तीने घरात राहावे लागल्याने सध्या हा तणाव सर्वत्र आहे. आपले रूटीन बिघडते, हवे तसे घडत नाही, त्या वेळी उदास वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या परिस्थितीत आपल्याकडे नक्की काय आहे आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, याचा विचार केला तर सध्याचा काळ हा आपल्या आयुष्याचा चांगल्या दिशेने टर्निग पम्म्ॉइंट ठरू शकतो. रमीच्या खेळात हवे ते पान येत नाही म्हणून चिडचिड करत राहणाऱ्या खेळाडूपेक्षा हातात येणाऱ्या पानानुसार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणाऱ्या खेळाडूचा सीक्वेन्स लवकर लागतो. आयुष्य हादेखील एक रमीचा डाव आहे; त्यामध्ये आत्ता आपल्या हातात काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करता येईल, हे ठरवले तर उदासी कमी होते. अस्वस्थता असते त्या वेळी- आपण काही तरी करतो आहोत, हा भाव समाधान देणारा असतो. सध्या रोज मिळणारा वेळ आपण काही तरी चांगले करण्यासाठी देऊ शकतो. या काळात करमणुकीचे कार्यक्रम पाहायला हवेत, पण त्याबरोबर स्वत:ची आंतरिक शिस्त विकसित करण्यासाठीही हा वेळ वापरता येऊ शकतो. त्यासाठी घरातील सर्वाना ठरावीक वेळ मौन पाळता येऊ शकते. एक दिवस डिजिटल डीटॉक्सिफिकेशनसाठी देऊन त्या दिवशी टीव्ही, मोबाइल पूर्ण बंद ठेवता येऊ शकतो. एक दिवस लंघन करता येऊ शकते. रोज ठरावीक वेळ ध्यानासाठी, वाचनासाठी, व्यायामासाठी द्यायचा, असाही निश्चय करता येऊ शकतो. सध्या सतत एकत्र राहावे लागू लागल्याने आपापसांतील भांडणे वाढू लागली आहेत. अशी भांडणे होण्याचे एक कारण प्रत्येकाची मूल्ये, त्याला/तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. मला जे महत्त्वाचे वाटते तेच सर्वाना वाटावे, असा आग्रह भांडणे वाढवतो. आत्ता मिळालेल्या वेळेचा उपयोग करून घरातील सारे जण त्यांना काय महत्त्वाचे वाटते, हे लिहून काढू शकतात. त्यामधून संपूर्ण कुटुंबाची काही वेगळी ओळख निर्माण करता येऊ शकते का, असा विचार होऊ शकतो. आपण जे काही करीत असू त्यामध्ये लक्ष ठेवणे हेदेखील एक कौशल्य आहे. सध्याचा काळ अधिकाधिक वेळ वर्तमान क्षणात लक्ष ठेवण्याचा सराव करण्यासाठी दिला तर तणाव कमी होईलच आणि हे कौशल्य पुढील आयुष्यातही उपयोगी ठरेल.

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychological stress on depression the links between stress and depression zws