मानांकन प्रणाली न लादण्याची मागणी; पालघर जिल्ह्यातील सातशे सराफा दुकाने दिवसभर बंद

पालघर : सोन्याच्या दागिन्यांवर त्याच्या शुद्धतेसाठी हमी देणाऱ्या मानांकन प्रणालीची (एचयूआयडी) सक्ती केंद्र सरकारने बंधनकारक केली आहे. यामुळे सराफा व्यवसायिकांमध्ये खदखद असून या विरोधात पालघर जिल्ह्यतील सातशे सराफा दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक जूनपासून या मानांकनाची सक्ती केली जाणार आहे. या मानांकनाची तपासणी युनिक आयडी प्रणालीद्वारे केली जाणार असल्यामुळे ती जाचक व असंविधानिक असल्याचा आरोप सराफा व्यवसायिकांनी केला आहे. या प्रक्रियेमुळे याआधीच आर्थिक संकटात असलेल्या सराफा व्यावसायिकांना या प्रक्रियेद्वारे कोणी कुठे? कसे? किती? कॅरेटमध्ये सोने विकले या सर्व गोष्टींचा लेखाजोखा ठेवायचा असल्यामुळे गुंता वाढणार आहे. यासाठी जादा कामगार ठेवावे लागणार आहेत. करोनाकाळात कंबरडे मोडलेल्या सराफा व्यावसायिकांना हे परवडणारे नसल्यामुळे या प्रणालीला आमचा विरोध असल्याचे सराफा व्यावसायिक सांगत आहे.

पालघर जिल्ह्यतून सराफा व्यवसायिकांमार्फत ‘हॉलमार्क’ या मानांकनाचे स्वागत केले असले तरी युनिक आयडी द्वारे शुद्धता तपासणी करणारी प्रणाली याची अंमलबजावणी जाचक व कठीण आहे. त्यामुळे या प्रणालीला आमचा तीव्र निषेध आहे. सद्य:स्थितीत व्यवसाय डबघाईला लागल्यामुळे कामगार वर्ग कमी आहेत. त्यातच अशा पद्धतीची प्रणाली वापरल्यास मनुष्यबळ व त्यासाठी आर्थिक भुर्दंड व्यावसायिकांना बसणार असल्यामुळे सध्या तरी या प्रकारची प्रणाली आम्हा व्यावसायिकांवर थोपवू नये अशी मागणी केली गेली. पालघर येथे या प्रणालीविरोधात सराफा दुकानांसमोर व्यावसायिकांनी निषेध आंदोलने केली व ही प्रणाली लागू नये यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यामार्फत शासनाला विनंती निवेदन महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन या सराफा व्यावसायिकांच्या संघटनेने पाठवले आहे.

जिल्ह्यात फक्त दोन केंद्रे

पालघर जिल्ह्यत ७०० हून अधिक सराफ व्यावसायिकांची सोने-चांदीच्या दागिन्यांची दुकाने आहेत या प्रणालीद्वारे नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यत फक्त दोनच केंद्रे आहेत त्यामुळे या प्रणालीत अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात तसेच दोनच केंद्रे असल्यामुळे एवढय़ा मोठय़ा संख्येच्या दुकानांना नियंत्रण व त्यांचे प्रणालीवरचे सोने व्यवहारांचे काम पाहणे शक्य होणार नाही.

आम्ही ‘हॉलमार्किंग’चे स्वागत करतो. मात्र एचयूआयडी आम्हाला मंजूर नाही. एचयूआयडी सेंटर पालघर जिल्ह्यमध्ये फक्त दोन आहेत आणि सातशे ज्वेलर्सचे दुकान आहे तर ते करणे कसे काय शक्य होणार? त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करतोय

– अरुण जैन, पालघर तालुका ज्वेलर्स असोसिएशन, पालघर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellers palghar district huid hallmark gold ssh