मुख्यालयाला जोडणारे रस्ते रुंद होणार; अर्थसंकल्पात तरतूद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज राऊत

पालघर : पालघर येथे उभारण्यात आलेल्या नवीन जिल्हा मुख्यालय संकुलापासून बोईसर कुरगावपर्यंतचा रस्ता १० मीटर रुंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्य़ातील इतर अनेक महत्त्वपूर्ण रस्ते रुंदीकरणाचे प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर झाले आहेत.  यासाठी ३४ कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे.  ऑक्टोबरनंतर प्रत्यक्षात या कामाला  सुरुवात होणार आहे.

सन २०२० च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामे करोना टाळेबंदीमुळे लांबणीवर पडली आहेत. त्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते खारेकुरण नाका रस्त्याचे चौपदरीकरण, केळवे पूल नाका ते माकुणसार, माकुणसार ते कपास तसेच तांदूळवाडी ते पारगाव चौकी रुंदीकरणाची कामे मंजूर आहेत. याखेरीज चहाडे खडकोली रस्त्याचे रुंदीकरण व पुलाचे बांधकाम, रावते- महागाव रस्त्यावर चार पुलांची नव्याने उभारणी व रुंदीकरण यांचा समावेश आहे. ही कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत.  याचबरोबरीने पालघर वळण नाक्यापासून रस्त्याच्या एका बाजूला गटार बांधण्याचे कामदेखील प्रलंबित राहिले आहे.

सन २०२१ च्या अर्थसंकल्पात झाई-बोर्डी ते रेवस-रेड्डी या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक चार अंतर्गत सुमारे वीस कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तारापूर बायपास रस्त्याचे व पाच मार्ग-परनाळी रस्त्याचे दहा मीटर रुंदीकरण, रेवाळे- जोगळे नाका तसेच कर्दळी ते सफाळा रेल्वे उड्डाण पुलापर्यंत सात मीटर रुंदीकरण, सफाळे बाजार ते नवघर फाटा दरम्यान दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. या बरोबरीने तांदूळवाडी घाटातील रस्त्याच्या भूस्खलन भागामध्ये सुरक्षा भिंत उभारणे, पालघर शहर बायपास रस्त्याची नूतनीकरण करून काही भागात गटर बांधणे या कामांचा समावेश आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात घाटीम- तांदूळवाडी रस्त्यावर उचवलीजवळ पूल व मोऱ्याची बांधणी करणे, केळवा रोड स्थानक ते जोगाळे नाका रस्त्याचे सात मीटर रुंदीकरण करून त्या रस्त्यावरील अरुंद पूल-मोरांचा विस्तार करणे, माकुणसार नाका ते तिघरे या रस्त्याचे सात मीटर रुंदीकरण करणे तसेच रावते-महागाव रस्त्याचे साडेपाच मीटर रुंदीकरण करून चार पूल उभारणे प्रस्तावित आहे.

नाबार्ड अंतर्गत दापोली-उमरोळी, मान-वेडगेपाडा, निहे-मासवण, खुताड- हनुमान नगर दरम्यान तसेच तिघरे- दांडा खाडी दरम्यान पुलाच्या उभारणीसाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याखेरीज जिल्ह्य़ातील इतर प्रमुख जिल्हा मार्गांसाठी दहा कोटी रुपयांची कामे मंजूर झाले असून या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

ऑक्टोबरनंतर कामांना सुरुवात

पावसाळ्यादरम्यान या कामांच्या निविदा काढून ऑक्टोबपर्यंत ठेकेदारांना काम बहाल करण्याचा प्रयत्न असून पावसाळा संपल्यानंतर ही कामे सुरू होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीची प्रलंबित कामे तसेच या वर्षीची कामे डिसेंबर, जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यास आगामी वर्षांत नागरिकांना अनेक ठिकाणी रुंद रस्त्यांवरून प्रवास करणे सुलभ होईल, अशी जिल्हावासीयांना आशा आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads connecting the headquarters will be widened ssh