आयुर्वेद रसशाळेच्या आवारातील ‘गॅलेक्सी केअर रुग्णालया’ ला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागून काही काळासाठी रुग्णांमध्ये घबराट उडाली. मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी काहीच मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याने १४ रुग्णांना इतर रुग्णालयांत सुखरूप हलवण्यात यश आले. यांतील पाच रुग्ण रुग्णालयाच्या ‘पोस्ट ऑपरेटिव्ह रुम’मध्ये, तर नऊ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होते. या रुग्णांचा वयोगट ४० ते ६० च्या दरम्यान असून त्यांना संजीवन व पूना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली अगरवाल- जोशी म्हणाल्या, ‘‘पहाटे ३.३५ वाजता रुग्णालयातील उपकरणे ठेवलेल्या लाकडी कपाटातून धूर येत असल्याचे दिसले. प्रथम फायर एस्टिंग्विशर वापरून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आग वेगाने पसरत असल्याने अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. ३.४५ वाजता अग्निशामक दलाचे चार बंब व पाण्याचा एक टँकर रुग्णालयात पोहोचले. आग लगेच आटोक्यात आली, परंतु धूर कमी होत नसल्याने खिडकीच्या काचा फोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आले. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत धूर पूर्णपणे हटवण्यात आला होता. धुरात अडकलेले सर्व रुग्ण सुस्थितीत असून गॅलेक्सी रुग्णालयांतील तज्ज्ञ त्यांना संजीवन व पूना रुग्णालयांत जाऊन सेवा देत आहेत.’’
एरंडवणा अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेश जगताप म्हणाले, ‘‘आगीमुळे प्रचंड धूर झाल्याने परिस्थिती गंभीर स्वरुपाची होती. अग्निशमन यंत्रणा बसवून घेण्यासाठी रुग्णालयाला अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते. या प्रमाणपत्राची मुदत एक वर्ष असते. ही यंत्रणा बसवण्यासाठी पाण्याची टाकी, पंप वगैरे बसवण्याचे काम रुग्णालयात सुरू होते.’’ जगताप यांच्यासह केंद्र प्रमुख सुनील गिलबिले, प्रमोद सोनवणे आणि तीस अग्निशमन कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात भाग घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Galaxy care hospital caught in fire