महाबळेश्वरला गेल्यावर नेमके काय पाहायचे आणि किती पाहायचे? हा पर्यटकांना नेहमीच पडणारा प्रश्न. माहिती नसल्याने वरवरची चार-दोन ठिकाणे पाहिली जातात, पण खरेखुरे महाबळेश्वर पाहायचे राहून जाते. ही उणीव दूर करण्यासाठी महाबळेश्वरची सर्व प्रकारची माहिती असलेले ‘अतुलनीय महाबळेश्वर’ ही चित्रमय मार्गदर्शिका महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेतर्फे तयार करण्यात आली आहे. त्यात कृष्णेसह पाच नद्यांचा उगम; लिंगमळा, ऑर्थर सीट, केट्स यासारखे पॉइंट्स; तऱ्हेतऱ्हेचे सर्प, पक्षी, प्राणी, फुलपाखरे, रानफुलोरा यांची विविधता तसेच, या गिरिस्थानाचा १३ शतकापासूनचा इतिहास अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. या मार्गदर्शिकेचे प्रकाशन येत्या आठवडाभरातच होणार आहे.
सातारा येथील निसर्गअभ्यासक सुनील भोईटे यांनी या मार्गदर्शिकेचे लेखन व संपादन केले आहे. त्यात महाबळेश्वरशी संबंधित यादव राजवटीपासून, शिवकाळ आणि पेशवे-ब्रिटिशांपर्यंतचा इतिहास आहे. त्या ठिकाणची विविध प्रसिद्ध ठिकाणे, महाबळेश्वरचे पावसाळ्यातील सौंदर्य, विविध ज्ञात-अज्ञात धबधबे, परिसरातील पुष्पपठारे, वेण्णा तलाव, महाबळेश्वरची ओळख असलेले घोडेस्वार रस्ते, तेथील ब्रिटिशकालीन इमारती, जुने हवामान केंद्र, मध संचालनालय-गहू गेरवा केंद्र यांसारख्या संशोधन संस्थांचा समावेश आहे. या मार्गदर्शक पुस्तिकेचे आणखी एक आकर्षण म्हणजे महाबळेश्वर येथे असलेली निसर्गसंपदा. महाबळेश्वरच्या परिसरातील डोंगर-दऱ्या, पठारे यावर आढळणारी हंगामी रानफुले, झुडपे, वृक्ष, वेली तसेच, तेथील विविधरंगी फुलपाखरे, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, वन्य प्राणी, सापांसह सरीसृप, विविध प्रकारच्या बुरशी यांची चित्रमय माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यात सुनील भोईटे यांनी काढलेल्या आकर्षक आणि माहितीपूर्ण छायाचित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही माहिती मराठी तसेच इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये असल्याने ती पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘निसर्ग पर्यटनात वाढ होईल’
‘‘महाबळेश्वरला पर्यटक मोठय़ा संख्येने भेट देतात. मात्र, येथील जैवविविधतेबाबहत समग्र-सचित्र माहिती देणारे पुस्तक सध्या तरी उपलब्ध नाही. ‘अतुलनीय महाबळेश्वर’ या पुस्तकाच्या माध्यमातून महाबळेश्वरचा पर्यटन विकास, विविध प्रेक्षणीय स्थळे, जैव विविविधता यांची एकत्र मांडणी करण्यात आली आहे. ती पर्यटकांना उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे निसर्ग पर्यटनात वाढही होईल.’’
– सचिन पवार, मुख्याधिकारी महाबळेश्वरह गिरिस्थान नगरपरिषद
.

‘महाबळेश्वरची खरी ओळख होईल’
‘‘महाबळेश्वर हे निसर्गसंपदेच्या दृष्टीने अतिशय उजवे ठिकाण आहे. त्याची खरी ओळख व्हावी या दृष्टीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. येथे भेट देणाऱ्यांना पर्यटनस्थळाची माहिती व्हावी, त्याचबरोबर येथील निसर्गाचे संरक्षण-संवर्धन व्हावे हा हेतूही त्यामागे आहे.’’
– सुनील भोईटे, लेखक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guide book including beautiful spots in mahabaleshwar