नगर रस्त्यावरील इनॉरबिट मॉलला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या बारा गाडय़ांकडून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडेअकरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत मॉलचा तिसरा आणि चौथा मजला जळाला आहे. आगीमुळे धुराचे लोट येत असल्यामुळे आग विझवण्यास मोठय़ा अडचणी येत आहेत. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
याबाबत अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर यांनी सांगितले की, रात्री नऊच्या सुमारास आग लागली आहे. रात्री साडेअकरापर्यंत चौथ्या मजल्यावरील आग विझवण्यात यश आले आहे. मात्र, तिसऱ्या मजल्यावरील आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाडय़ा, टँकर आणि ब्रान्टोच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये कोणी अडकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inorbit mall caught in fire