देशाचा विकासदर मंदावलेला असताना पुण्यातील उद्योगांमध्ये व्यवसायातील वृद्धीबाबत आशादायी चित्र आहे. पुण्यातील ८४ टक्के कंपन्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. विशेष म्हणजे, सूक्ष्म आणि लघुउद्योग यात आघाडीवर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक पातळीवर मंदीचे वारे असून, देशाच्या विकास दरात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात विकास दर ८.२ टक्के होता. चालू आर्थिक वर्षात विकास दर ६.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा चार वर्षांतील नीचांकी विकास दर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्यातील उद्योगांमध्ये वाढीबाबत आशादायी चित्र आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) १०८ कंपन्यांचे मासिक सर्वेक्षण करून फेब्रुवारीतील त्यांच्या वाढीच्या अपेक्षांबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाबाबतचा अंदाज कंपन्यांनी या अहवालात वर्तविला आहे. या अहवालानुसार, पुण्यातील ८४ टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. याच वेळी १० टक्के कंपन्यांना जैसे थे स्थिती अपेक्षित असून, ६ टक्के कंपन्यांनी घट होण्याची शक्यता नोंदविली आहे. संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्या वाढीबाबत जास्त आशावादी आहेत.

फेब्रुवारीतील सर्वेक्षणात सहभागी २४ कंपन्यांनी १ ते १० टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यात २ मोठ्या, ५ मध्यम, १३ लघु आणि ४ सूक्ष्म कंपन्या आहेत. याचवेळी १० ते २० टक्के वाढीचा अंदाज वर्तविणाऱ्या ३९ कंपन्या आहेत. त्यात मोठी एकही कंपनी नसून, ३ मध्यम, १९ लघु, १७ सूक्ष्म कंपन्या आहेत. तसेच, २० टक्क्यांहून अधिक वाढीबाबत सकारात्मक असलेल्या एकूण २८ कंपन्या आहेत. त्यात १ मोठी, २ मध्यम, १६ लघु, ९ सूक्ष्म कंपन्यांच्या समावेश आहे. यात १ ते २० टक्क्यांहून अधिक वाढीबाबत आशादायी असलेल्या कंपन्यांत ३ मोठ्या, १० मध्यम, ४८ मध्यम आणि ३० सूक्ष्म कंपन्या आहेत. मोठ्या आणि मध्यम कंपन्यांच्या तुलनेत लघु व सूक्ष्म कंपन्यांमध्ये वाढीबाबत अधिक आशादायी वातावरण दिसून येत आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यात ५ टक्के मोठ्या कंपन्या (२५० कोटी रुपयांहून अधिक महसूल), ९ टक्के मध्यम कंपन्या, ३० टक्के लघु कंपन्या आणि ५६ टक्के सूक्ष्म कंपन्या आहेत. देशातील उद्योगांच्या सध्याच्या संख्याबळानुसार या सर्वेक्षणात प्रत्येक वर्गातील कंपन्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम कंपन्यांची संख्या देशात जास्त असल्याने त्यांचे या सर्वेक्षणातील प्रतिनिधित्व जास्त आहे.

गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात २८ टक्के कंपन्यांनी महसुलात २० टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांची संख्या या महिन्यात कमी होऊन २६ टक्क्यांवर आली आहे. याच वेळी १० ते २० टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत ३२ वरून वाढून ३६ टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच, १ ते १० टक्के वाढ अपेक्षित असलेल्या कंपन्यांची संख्याही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी होऊन २४ वरून २२ टक्क्यांवर आली आहे. नकारात्मक वाढीचा अंदाज वर्तविणाऱ्या कंपन्यांची संख्या १ टक्क्याने वाढून ६ टक्क्यांवर पोहोचली आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promising picture of growth in industries in pune mccia survey of 108 companies pune print news stj 05 zws