[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही पदार्थ खाण्याला एक ठराविक वेळ, काळ असावा लागतो. म्हणजे, ते तसे कुठल्याही वेळी खाता येतात, पण ते विशिष्ट वेळी खाल्ले, तर त्यांची लज्जत वाढते. सकाळी चहाबरोबर पेपर वाचत, गप्पा मारत चकली कुडकुडवण्यात किंवा बिस्किटाचे तुकडे मोडण्यात वेगळीच मजा असते. त्यानं चहाची रंगत वाढते. दुपारच्या जेवणात पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर भाजी, आमटी असेल, तरी वेगळी चटणी, कोशिंबीर असली, तर जेवणाला खास चव येते. कुठल्या पदार्थाबरोबर कुठली चटणी खायची, हे गणितही ठरलेलं असतं. तशी समोसा ही गोष्ट संध्याकाळी, मस्त गार वारा सुटलेला असताना, एखाद्या आवडत्या कट्ट्यावर गप्पा हाणत बसल्यानंतर खायची गोष्ट आहे. सामोसा खाणं हीच एक मैफल असते. आत वेगळं सारण, बाहेरून वेगळं आवरण, हे दोन्ही तळल्यानंतर त्याला येणारी एक आगळी चव, चटपटीत आणि झणझणीतपणा, याची कशाशी तुलनाच होऊ शकत नाही. संध्याकाळच्या अशा गप्पांच्या मैफलीबरोबरच समोसाची चव द्विगुणित होते, ती थिएटरच्या मध्यांतरात. अर्ध्या सिनेमाचा आनंद घेऊन झाल्यानंतर समोसा चघळत आणि चहा किंवा कॉफीचे घुटके घेत त्यावर चर्चा करण्याचा आनंद वेगळा असतो. सामोशाचाच धाकटा भाऊ म्हणजे पट्टी सामोसा. इराणी हॉटेलमधला हा लोकप्रिय प्रकार अतिशय चविष्ट आणि स्वतःची वेगळी ओळख राखणारा. नेहमीच्या सामोशापेक्षा जास्त चुरचुरीत आणि छोटा असल्यामुळे काही लोकांना हा जास्त आवडीचा असतो. विशेषतः जागतिक आरोग्य वगैरे गंभीर समस्यांवर चर्चा करायची असेल, तर चहा आणि पट्टी सामोसा, यांना पर्याय नाही! तुम्हीसुद्धा घरी हा सामोसा (आणि चर्चा!) करून बघा.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • आवरणासाठी
  • २ वाट्या मैदा
  • १ वाटी बेसन
  • ५ चमचे तेल (मोहनासाठी)
  • सारणासाठी
  • १ वाटी मटार
  • २ उकडलेले बटाटे
  • अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा लिंबू रस
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ५ चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे.
  • बटाटे सोलून त्याच्या छोट्या छोट्या चौकोनी फोडी कराव्यात किंवा स्मॅश करावेत.
  • फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी
  • फोडणीत कोबी घालून परतावा आणि एक वाफ आणावी.
  • नंतर मटार घालून मध्यम आचेवर वाफ काढावी. अधूनमधून ढवळावे.
  • मटार शिजले कि बटाट्याच्या फोडी घालून वाफ आणावी.
  • नंतर त्यात गरम मसाला, मीठ, लिंबू रस घालून ढवळावे. गॅस बंद करावा. मिश्रण गार होऊ द्यावे.
  • भिजवलेल्या पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पातळसर पोळ्या लाटाव्यात. प्रत्येक पोळी दोन्ही बाजूने फक्त ४ सेकंद भाजावी.
  • १/२ वाटी मैदा घेऊन त्याची घट्टसर पेस्ट बनवावी. भाजलेल्या प्रत्येक पोळीचे सुरीने दोन अर्धगोलाकार भाग करावेत.
  • अर्धगोलाच्या दोन्ही बाजूंवर पेस्ट लावून एकमेकावर जोडून कोन बनावावा.
  • कोनात २ चमचे भाजी भरून राहिलेल्या बाजूला पेस्ट लावून ती बाजू दुमडून चिकटवावी. त्रिकोणी आकार द्यावा. सामोसे मध्यम आचेवर तळून घ्यावेत.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make patti samosa