Kitchen Cooking Tips : स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला वाटते की, आपण बनवलेली पोळी मऊ आणि फुगीर व्हावी; पण पोळी बनवणे ही एक कला आहे, जी प्रत्येकालाच जमते, असे नाही. परंतु, काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही मऊ लुसलुशीत पोळ्या बनवू शकता. पोळी बनवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पीठ व्यवस्थित मळून घेणे. पीठ मळताना दोन गोष्टींची सर्वांत जास्त काळजी घेतली जाते. त्यात पहिली बाब म्हणजे पिठात किती पाणी घालायचे आणि दुसरी, पीठ मळताना हातांचा योग्य त्या पद्धतीने वापर करणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर जास्त पाणी घातले, तर पीठ पातळ होते आणि जर कमी पाणी असेल, तर पीठ खूप घट्ट होते, ज्यामुळे पोळी बनवणे कठीण होते. त्यामुळे पिठात योग्य पद्धतीने पाणी घालून मऊ पीठ मळणे थोडे कठीण वाटते. पण, आम्ही तुम्हाला पीठ मळण्याची अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त दोन मिनिटांत मऊ लुसलुशीत कणीक मळू शकाल,

मऊ पीठ मळण्याची सोपी ट्रिक

मऊ पीठ मळण्याची ही ट्रिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ट्रिक Smart_Woman_Tips_Babita नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. या ट्रिकमध्ये एक महिला प्लास्टिकच्या पिशवीच्या मदतीने दोन मिनिटांत मऊ पीठ मळण्याची पद्धत दाखवीत आहे. जर तुमच्या हाताला किंवा बोटाला दुखापत झाली असेल, तर ही ट्रिक खूप फायदेशीर ठरते.

सर्वप्रथम दोन वाटी गव्हाचे पीठ घ्या आणि ते स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीत टाका. गरजेनुसार थोडे मीठ आणि तूप घाला. आत थोडं थोडं पाणी घालून, पिशवीच्या बाहेरून ते पीठ हलवून चांगल्या रीतीने मिसळा. गरजेनुसार त्यात पाणी टाका. पोत तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर पिशवीला गाठ बांधा आणि पीठ दोन्ही हातांनी जोर लावून मळायला सुरुवात करा. अशा प्रकारे फक्त दोन मिनिटांत मऊशार कणीक तयार होईल. हे पीठ हातालाही चिकटणार नाही आणि पिशवीच्या आत मळले जाऊन, अगदी मऊशार होऊन जाईल.

पीठ मळताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

१) तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कोमट पाण्याने पीठ मळून, पीठ मऊशार बनवू शकता. कोमट पाण्याने पीठ सहज मळले जाते. त्यामुळे पोळ्या बनवणे सोपे होते.

२) पीठ मळल्यानंतर ते उघडे ठेवू नका. जर पीठ मळून उघडे ठेवले, तर ते कडक होऊ लागते. पीठ मऊ राहावे यासाठी त्यावर तुम्ही ओला कापड ठेवू शकता. ओल्या कापडाने कणीक झाकल्याने ते खूप मऊ होते आणि मग या पिठाच्या पोळ्या लाटणेदेखील खूप सोपे होते.

३) तसेच कणीक मळल्यानंतर लगेच त्याच्या पोळ्या बनवू नका. पीठ मळून घेतल्यानंतर ते २० मिनिटे बाजूला एका भांड्याखाली झाकून ठेवा. त्यामुळे तुमच्या पोळ्या मऊ आणि फुगीर होतील.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen cooking tips how to knead soft chapati dough in 2 minutes at home sjr