अगदी दहाच वर्षांपूर्वीची गोष्ट… लातूरमधल्या काही गावांमध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या चावडीसमोरून जाताना महिलांना चपला न घालता, मान खाली घालून आणि डोक्यावर पदर घेऊन जावे लागत असे. पण आज याच गावात महिला सरपंचांना सन्मानाने खुर्चीवर बसवले जाते आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदनदेखिल व्हायला लागले आहे.
—–
बोरी नावाच्या छोट्याशा गावात समीना पठाण सारखी मुस्लिम महिला गावातली दारुची दुकाने बंद करण्यात पुढाकार घेते, महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणारे भाषण व्यासपिठावरून करते आणि बचतगटाच्या माध्यमातून तिने केलेल्या कामाबद्दल ‘अफार्म’ संस्थेकडून तिचा गौरव झालेला आहे.
—–
दहा-बारा वर्षांपूर्वी महिलांच्या बचतगटांना खेडेगावांतून खूप विरोध होत असे – त्यांना लपून-छपून गुपचूप  बैठकींना यावे लागत असे! पण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून जेव्हा हळूहळू स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली तेव्हा मात्र घरातली पुरुषमंडळी त्यांना बचतगटाच्या बैठकांना जायला प्रोत्साहन देऊ लागली आहेत. बोरी गावात तर मुस्लिम महिलांचा स्वत:चा ’हाजी मक्काई महिला बचतगट’ आहे! – अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या निवासी प्रशिक्षण शिबिरांनाही महिला येऊ लागल्या आहेत !

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही सगळी निरिक्षणे आहेत – लातूरच्या चंद्रकला भार्गव यांची! चंद्रकलाताई गेली तीस वर्षे लातूर आणि चाकूर भागातल्या ग्रामीण महिलांसोबत काम करतात. या काळात त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत महिला बचत गटांचे काम उभे केले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत त्यांच्या आरोग्य आणि लैंगिक शिक्षणाबद्दल विचार रुजवायचा त्या प्रयत्न करीत आहेत. युनिसेफ या आंतरराष्टीय संस्थेचेही त्यांच्या कामाला सहकार्य मिळते. युनिसेफ च्या दीपशिखा उपक्रमातून त्यांनी अनेक महिलांना प्रेरिका प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. या महिला गावातल्या किशोरींसाठी नियमितपणे वर्ग चालवतात. आरोग्य, स्वच्छता, आहार, बालविवाह, स्त्री-पुरुष समानता अशा विषयांवर जाणीव जागृती करतात. या प्रेरिका ग्रामसभेत उत्साहाने सहभाग घेतात. त्यांनी उदगीर तालुक्यात शाळाबाह्य मुलींना शाळेत दाखल करायचे काम जोमाने सुरू केले.
त्याचबरोबर स्वत:चेही अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. एका तालुक्यातल्या १४ जणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश घेऊन ्पदवीधर होण्याचे स्वप्न पहात आहेत. बचतगटाच्या माध्यमातून एकमेकींना मानसिक आणि आर्थिक बळ देत आहेत. महिलांच्या ग्रामसभा आता केवळ कागदोपत्री राहिलेल्या नाहीत –तर त्या प्रत्यक्श अमलात येत आहेत! असे अनेक सकारात्मक बदल आता या भागातील महिलांच्या सामाजिक स्थितीमध्ये झालेले त्यांना पहायला मिळत आहेत. आणि याच बदलांचे प्रतिबिंब या भागातील पुरुषांच्याही वागणुकीत त्यांना दिसून आले आहे. बचतगटांच्या सहकार्याने स्वत:चे आयुष्य कष्टाने उभे करणाऱ्या अनेकजणींच्या नवऱ्यांनी दारू सोडली आणि ते काम करू लागले आहेत. हेर गावातल्या एका पुरुष कार्यकर्त्याने एक मुलगी झाल्यानंतर स्वत: कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे . आणखी एका कार्यकर्त्याने हुंडा न घेता लग्न करून वेगळा आदर्श उभा केला आहे. कदाचित हे बदल फार छोटे-छोटे दिसत असतील… स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून तिला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगायला अजून बरीच वाटचाल करावी लागणार आहे ;पण त्यादिशेने निश्चितपणे पावले पडायला लागलेली आहेत – हे नक्की!

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be the change you want to see