राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बु्द्ध जयंतीच्या उत्सवप्रसंगी ‘आपण बुद्ध धर्माची दीक्षा का घेत नाही?’ असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एका अनुयायाने पत्र पाठवून केला. या प्रश्नाचे उत्तर देताना महाराजांनी बुद्ध दीक्षेप्रमाणेच बुद्ध तत्त्वांच्या आचरणावर भर दिला आहे. ते म्हणतात : जगात जेवढे मानवधर्माची उन्नती करणारे महापुरुष झाले आहेत, त्या सर्वाचीच दीक्षा मी वयाच्या नवव्या वर्षीच घेतलेली आहे. मात्र मी बाहेरच्या रंगीबेरंगी दीक्षांना मानणारा मनुष्य नाही. त्यांच्या तत्त्वांचा चहूकडे प्रचार करण्याला आणि त्याप्रमाणे नवनिर्माण करण्यालाच मी खरी दीक्षा समजतो आणि सर्वच संप्रदायांतील यथार्थता दाखविण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला पुन्हा दीक्षा घेण्याचे काही कारणच दिसत नाही आणि अन्य कोणाला कोणत्या संप्रदायाची बाह्य दीक्षा घेणाऱ्यालाही मी सांगत नाही. आमचे दीक्षावस्त्र तेच आहे की जे सर्वसाधारण मनुष्य परिधान करतो; मात्र बुद्धांसारखे महापुरुष जे कार्य करून गेले ते कार्य केल्यानेच आमचे अंतरंग रंगले जाणार आहे असे मी समजतो. बु्द्ध पंथ चालविण्यापेक्षा बु्द्धाने दिलेल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व आचार करणे आवश्यक आहे. जो जो धर्म ज्या कोणा महापुरुषाचा तत्त्वप्रचार करीत असेल, तो जगातल्या सर्व धर्माशी सहमत होऊ शकतो. आकुंचित पंथ मात्र कधीही सहमत होणार नाही.

‘‘बुद्धांनी दिलेला महामंत्र ‘बहुजन हिताय। बहुजन सुखाय’ हा आजच्या भारतात घराघरांतून अनुभवास आणण्यासारखा आहे. तीच खरी बु्द्धसेवा आहे असे मी समजतो,’’  असे सांगून महाराज म्हणतात, ‘‘देशातील अन्य साधुसंतही हेच सांगत आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।।’’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बुद्धांचा संदेश आचरणात आणून २३ मे १९५६ रोजी गौतम बुद्धांची २५०० वी जयंती एक कोटी तासांचे श्रमदान करून साजरी केली. त्याला ‘समयदानयज्ञ’ नाव देऊन गावागावांत बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करून १०० गावे सामूहिक श्रमदानाने आदर्श करून दाखविली. महाराज ग्रामगीतेत म्हणतात :

हातीने घेता तलवार।

    बुद्ध राज्य करी जगावर।

यासी कारण एक प्रचार।

    प्रभावशाली।।

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara buddha jayanti buddhism rashtrasant tukdoji maharaj ysh