दिल्लीतील आणखी एका बलात्काराच्या घटनेने सारा देश हतबलतेच्या भावनेने ग्रस्त झाला आहे. पाच वर्षांच्या मुलीवर ज्या निर्घृणपणे आणि पाशवीपणे बलात्कार करण्यात आले आणि तिला जखमी करण्यात आले, त्यामुळे पुन्हा संताप निर्माण होणे स्वाभाविक होते. यापूर्वी दिल्लीतच निर्भयावर झालेल्या बलात्कारानंतर देशभर जो जनक्षोभ उसळला, त्यामुळे बलात्काराच्या कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला. समाजातील अशा कुप्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आणखी काय करायला हवे, याबद्दल माध्यमभर चर्चा सुरू झाल्या. माध्यमांनी अगदी पोटतिडिकीने हा विषय हाताळला, तरीही तो देशातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेलाच नाही, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले. फाशी की जन्मठेप यांसारख्या चर्चेपेक्षा बलात्कार करणाऱ्याला कशाची भीती वाटू शकते आणि ती त्याला वाटेल, यासाठी काय करायला हवे, याचा विचार करण्यास कुणीच तयार नाही. गेले काही महिने या घटनांबद्दल सर्व पातळीवर ओरड होत असतानाही कुणी पुन्हा असे किळसवाणे कृत्य करण्यास धजावतो, याचा अर्थ त्याच्यापर्यंत ही ओरड पोहोचलेलीच नाही असा होतो. दिल्लीतील पोलिसांनी शुक्रवारची घटना ज्या असंवेदनशीलतेने हाताळली, त्यावरून त्यांच्यापर्यंतही जनतेचा राग पोहोचला नाही, असे दिसते. बलात्काराच्या घटनेने आरपार हादरून गेलेल्या कुटुंबीयांना दोन हजार रुपये देऊन गप्प बसायला सांगणे, हा पोलीस खात्याचा अक्षम्य गुन्हा आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या युवतीवर हात उगारण्याची हिंमत सहायक पोलीस आयुक्तासारख्या अधिकाऱ्याकडे येऊ शकते, याचे कारण आपले कुणी काही वाकडे करू शकणार नाही, अशी त्याची खात्री आहे. सामाजिक पातळीवर महिलांवर होत असलेल्या विविध अन्यायांकडे सहृदयतेने पाहणे आवश्यक आहे, याची कोणतीच जाणीव पोलिसांना राहिलेली नाही, असे यावरून दिसून येते. दिल्लीतील घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यासारख्या शहरात मतिमंद मुलीवर रुग्णालयात बलात्काराची घटना घडते, यावरून समाजात गुन्हा करणाऱ्यांना शिक्षेची भीती घालण्यात पोलीस आणि माध्यमेही कमी पडतात की काय, असा प्रश्न पडतो. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पोहोच वाढला असला, तरी त्यातील मूलद्रव्यच वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, असाही याचा अर्थ निघू शकतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा घटनांचा सामना जगातल्या सगळ्याच देशांना करावा लागत आहे. अमेरिकेतील शस्त्र बाळगण्याच्या परवानगीने निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि गुन्हेगारांना त्वरित पकडून त्यांना कडक शिक्षा देण्यात अपयशी ठरलेली भारतातील स्थिती यामध्ये गुणात्मक साम्य आहे. बाल्य करपवणाऱ्या अशा घटनांचा व्रण खरे तर दीर्घकाळ टिकणारा असतो. प्रत्यक्षात तसे घडत मात्र नाही. समाजात सांस्कृतिक जाणिवा झिरपवणे किती महत्त्वाचे असते, हे अशा घटनांवरून दिसते. काय बरोबर अणि काय चूक, याचे भान जेव्हा समाजातील काही घटकांकडून सुटते, तेव्हा शिक्षेची जरब नाहीशी होताना दिसते. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ज्या किमान मूल्यांचे रोपण आजूबाजूच्या परिस्थितीतून होणे आवश्यक असते, ते झाले नाही की, अत्याचार करणाऱ्यास कशाचीच भीती वाटेनाशी होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे समाजाच्या मनात दुर्बलता निर्माण होते. त्याचा बंदोबस्त करणे अधिक तातडीचे आहे. हतबल होणे, हे निष्क्रिय होण्यापेक्षाही भयावह असते, हे लक्षात घेऊन संवेदनशीलता हरवल्याने कोडगा बनलेल्या समाजातील विशिष्ट घटकांत पुन्हा जीवनमूल्ये पेरणे म्हणूनच आवश्यक ठरते. सामाजिक परिस्थितीपासून ते शिक्षणापर्यंत आणि कायद्यापासून ते पोलिसांपर्यंत प्रत्येक पातळीवर अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यासच हे घडू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2013 रोजी प्रकाशित
सारेच हतबल
दिल्लीतील आणखी एका बलात्काराच्या घटनेने सारा देश हतबलतेच्या भावनेने ग्रस्त झाला आहे. पाच वर्षांच्या मुलीवर ज्या निर्घृणपणे आणि पाशवीपणे बलात्कार करण्यात आले आणि तिला जखमी करण्यात आले, त्यामुळे पुन्हा संताप निर्माण होणे स्वाभाविक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-04-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every body are helpless