scorecardresearch

Premium

सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा

सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी जीवघेणी स्पर्धा याआधीच सुरू झाली आहे.

Creative Artificial Intelligence
सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा (image – pixabay/representational image)

– पंकज फणसे

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विशेषतः युवकांसाठी नाविण्यपूर्ण नाही. लहानपणी चंपक, ठकठक, चांदोबा वगैरे मासिके वाचताना कित्येकांनी रोबोट बाळगायची स्वप्ने उराशी बाळगली असतील. शंकर नावाच्या तमिळ दिग्दर्शकाच्या रोबोट या चित्रपटाने घातलेली भुरळ आणि रजनीकांतचे विविधरंगी अवतार अजूनही चित्रपट रसिकांच्या स्मरणात असतील तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता जोपासायची आणि आत्मसात करायची उत्कटता केवळ आजचीच आहे असेही नाही. स्टॅनफोर्ड विद्यापिठातील तज्ञ ॲडिएन मेयर यांच्या म्हणण्यानुसार स्वयंचलित उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता बाळगण्याची मनीषा नागरीकरणाच्या प्रारंभापासून दृष्टीक्षेपास पडते. मात्र सध्याच्या काळात काही बदलले असेल तर मानवी कल्पनेच्या या भराऱ्या वास्तवात उतरण्याची शक्यता गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ओपनएआय या सिलिकॉन व्हॅली स्थित नवउद्यमी उद्योगाने चॅटजीपीटी (ChatGPT) या सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यासपीठाचे सादरीकरण केले आणि स्वप्नवत वेगाने केवळ ६ महिन्यांत १० कोटी वापरकर्त्यांचा पल्ला गाठला.

s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
Chandrayaan 3 Update To Finish As Sun Sets On Moon Surface Vikram Pragyan sleep What Will Happen To mission by ISRO
चंद्रावर सूर्यास्त! Chandrayaan-3 विषयी मोठी अपडेट, ‘विक्रम’-‘प्रज्ञान’ला जाग आली का? मोहिमेचं पुढे काय होणार?
implementation of Multiple Entry and Multiple Exit
विश्लेषण: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली ‘मल्टिपल एंट्री, मल्टिपल एग्झिट’ची अंमलबजावणी आव्हानात्मक का?
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!

१८ जुलै २०२३ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये कृत्रिम प्रज्ञेच्या धोरणाच्या मूल्यांकनासंदर्भात बैठक आयोजित केली होती. सदरहू बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अन्टानिओ गुटरेस यांनी सदस्य राष्ट्रांच्या सहकार्यावर भर देताना मानवतेला कृत्रिम प्रज्ञेच्या जोखमीपासून दूर ठेवण्याची हमी घेण्यास सांगितले. तद्वतच कृत्रिम प्रज्ञेच्या बंधनकारक नियमांसाठी २०२६ ही सीमारेषा प्रस्तावित केली. वाचून आश्चर्य वाटेल की सायबर सुरक्षा १९७० पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असली तरी केवळ २०२१ मध्ये सुरक्षा परिषदेने सायबर सुरक्षा या विषयावर स्वतंत्र बैठक घेतली. मात्र सादरीकरणाच्या केवळ ६ महिन्यांत सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाली.

हेही वाचा – बुलडोझर प्रशासन; आश्रित कुटुंबीय!

सृजनात्मक कृत्रिम प्रज्ञेच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. सुरक्षा परिषदेत चीनने प्रज्ञेचा उल्लेख दुधारी तलवार असाच केला होता. कृत्रिम प्रज्ञेच्या बहुआयामी वैशिष्ट्यामुळे तिचा वापर प्रशिक्षणापासून रॉकेट प्रक्षेपणापर्यंत विविध सेवांमध्ये संभव आहे. कृत्रिम प्रज्ञा भारित सुरक्षा प्रणाली फसवे ई-मेल आणि इतर सायबर हल्ले ओळखण्यासाठी सक्षम केली जाऊ शकते. उत्पादक कृत्रिम बुद्धिमत्तेची विविध वास्तव परिस्थितींची पुनर्निर्मिती करण्याची क्षमता सुरक्षात्मक नियंत्रके आणि प्रतिसादांचे परिक्षण तसेच मूल्यमापन करण्यास सहाय्यभूत ठरते. या क्षमतेमुळे प्रणालीतील उणिवा ओळखता येतात, आणि सुरक्षेबाबतची सजगता एकूणच वाढते. शिवाय मोठ्या प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण करून सुरक्षेस घातक असणारे कृतिक्रम आणि सूचके हेरण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते. त्यामुळे धोक्यांचा तात्काळ शोध घेणे आणि त्यास त्वरीत प्रतिसाद देणे सुलभ होते.

सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक विदा प्रक्रिया प्रणाली आहे. तिची निर्मिती मोठ्या प्रमाणावरील विदा हाताळण्यासाठी केली गेली आहे. ऑक्सफर्ड प्राध्यापक वी शेंग यांच्या प्रतिपादनानुसार चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या व्यासपीठांची निर्मिती एक विदा प्रक्रिया प्रणाली म्हणून झाली आहे. ज्यामध्ये वास्तवाच्या आकलनाचा अभाव आहे. सदर अभाव जटील समस्यांना कारणीभूत ठरत आहे. वास्तवाशी असलेली अनभिन्नता एकाचवेळी अनेक वास्तवांचे अभिरुपन (creation of multiple realitis) करू शकते. अशा कौशल्यांमुळे खरे जग आणि आभासी जग यांच्यामधील सीमारेषा अधिक धूसर होत आहे. मागील वर्षी रशियाने केलेल्या युक्रेन आक्रमणानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक खोटे व्हिडीओ तयार केले गेले. त्यामुळे युद्धतळावरील सैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले. उदाहरणादाखल एका दृकश्राव्य फितीमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलिन्स्की हे सैन्याला शरण येण्याचे आवाहन करताना दिसत होते. मात्र अधिक चौकशीनंतर हा व्हिडीओ डिप फेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केला असल्याचे लक्षात आले. सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता ही अशाप्रकारे स्वनिर्मित खोटी माहिती प्रस्तुत करून द्वेष वाढवणे, मानवी हक्कांची पायमल्ली, लिंगभेद आणि परवानगीविना पाळत ठेवणे आदी गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वात आव्हानात्मक वैशिष्ट्य म्हणजे स्वत: शिकण्याची आणि अवलोकन करण्याची कला! सदर व्यासपीठ निरंतर असून घडणाऱ्या गोष्टी आत्मसात करून मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टींचे पृथकरण करून अकल्पित तथ्यानिशी प्रकट होते. ज्यामुळे अनिश्चितता आणि गैरवापराचा धोका सदैव अस्तित्वात आहे. एका अर्थाने शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमधून मानवी अवयव तसेच रक्ताची निर्मिती करू शकले नाहीत तर थेट मेंदूची आणि विचार प्रक्रियेची नक्कल करण्याचे प्रयत्न जात्याच संशयास्पद आहेत.

विज्ञान प्रगतीचे नवनवे टप्पे पार करत असताना ‘नवीन शोध’ ही गेल्या काही दशकांतील सामान्य बाब बनली आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या प्रत्येक टप्यावर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला समाजाच्या ठरावीक घटकाने कायमच विरोध केला. आठवतंय ना, आपल्या मातीतल्या लक्ष्मण किर्लोस्करांनी लाकडाऐवजी लोखंडी नांगराचा फाळ बनविला, तेव्हा त्याच्याकडे हा फाळ शेतात विष पसरवेल म्हणून संशयास्पद दृष्टीने बघितले गेले होते! असो !! तर याठिकाणी सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ज्या काही शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्या साऱ्याच रास्त आहेत असेही नाही. कदाचित उपरोक्त मनस्थितीचा हा परिपाक असू शकेल. मात्र याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की आतापर्यंतचे तंत्रज्ञान केवळ मानवाला कृती करण्यासाठी सक्षम करत होते. (Enabler) मात्र सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची वापरकर्ती (operator) देखील बनली आहे. हा इतर तंत्रज्ञानात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत लक्षणीय फरक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची चिंता करण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे खासगी क्षेत्राकडे असणारे या तंत्रज्ञानाचे नियंत्रण! नफेखोरीच्या युगात कॉर्पोरेट उद्योगाच्या अजेंड्यावर सर्वसमावेशकता सखोल चिंतन असणे दुर्मिळच ! नुकतेच गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या प्रमुखपदी गेली २० वर्षे असणाऱ्या जॉफ्री हिन्टन यांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या मुलाखतीत हतबलता व्यक्त करताना त्यांनी गेल्या २० वर्षांतील संशोधनामुळे मानवजातीला धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करतानाच पश्चातापाची कबुली दिली. मात्र त्याचवेळी त्यांनी पुष्टी केली की मी हे संशोधन केले नसते तर आणखी कुणी तरी कसर भरून काढलीच असती ! योगायोगाची बाब म्हणजे या भावनांशी थेट साम्य मिळते ते रॉबर्ट ओपनहायमर यांच्या १९४५ मधील अण्विक चाचणीनंतर झालेल्या मुलाखतीशी. आशा करूया की सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेला गांर्भीयाने घ्यायला मानव जातीला ‘हिरोशिमा क्षणा’ची वाट पाहायला लागू नये !

सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी जीवघेणी स्पर्धा यापूर्वीच सुरू झालेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आभासी स्वरुपामुळे तंत्रज्ञानाने हस्तांतरण आणि विदा देवाण घेवाण टाळणे अशक्य असले तरी राष्ट्रांचा जोर तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या हार्डवेअर नियंत्रणावर आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या आरेखनामध्ये महत्वपूर्ण असणारा घटक म्हणजे सेमीकंडक्टरची चीप. चॅटजीपीटीची (ChatGPT) उभारणी अशा १०,००० अत्युच्च दर्जाच्या चिप्सवर झालेली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्यात धोरणात त्यांनी चीनला प्रत्यक्ष अत्युच्च क्षमतेच्या चिप्स पुरविण्याचे अथवा त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे नाकारले आहे. ही नवीन क्षेत्रातील भू-राजकीय चढाओढींची केवळ सुरुवात आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनासाठी सदस्य राष्टांकडून सहकार्य आणि समन्वयाची अपेक्षा केली आहे. वस्तुतः कित्येक देशांनी नियमनासाठी या आधीच पावले उचलायला सुरुवात केली आहे. जपानकडून सुरुवात करण्यात आलेली हिरोशिमा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्रिया (Hiroshima AS Process ) तर चीनने २०१७ सालीच नवीन पिढीचा कृत्रिम बुद्धिमत्ता विकास कार्यक्रम जाहीर केला होता. रशियाने खासगी क्षेत्राच्या नियंत्रणावर चिंता व्यक्त करताना शासकीय अधिक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. विकसित राष्ट्रे नियमनाच्या या लढाईत आघाडीवर आहेत अशावेळी भारतासारख्या महत्त्वाच्या देशाला ‘थांबा आणि पहा’ हे धोरण अंगिकारण्याची मुभा नाही.

हेही वाचा – कसा असेल मणिपूरमधला तपास?

भारतासाठी सूचितार्थ:-

भारतासारख्या संगणकीय तंत्रज्ञ विपुल असणाऱ्या देशात सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधीचा वापर करण्यास पुरेसा वाव आहे. आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता रोग निदान आणि उपचार पद्धतीमध्ये वैद्यकीय विदा विश्लेषणाने आणि रुग्णांच्या लक्षणांचे भाकीत करून क्रांती घडवू शकते. शिक्षणव्यवस्थेमध्ये, विद्यार्थीसापेक्ष अभ्यासक्रम विकसित करून प्रत्येक विद्यार्थ्याला क्षमतेनुसार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका कृत्रिम बुद्धिमत्ता बजावू शकते. तर कृषी क्षेत्रात सिंचन, खत पुरवठा, कीटक नाशकांचा वापर यांच्या विदेचे विश्लेषण करून उत्पादन आणि दर्जा याबद्दल भाकित करता येईल.

धोरणनिर्मितीसाठी भारत सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. INDIAai या शासकीय पोर्टलकडून सृजनात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता अहवाल विकसित करण्यात आला आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता भागीदारी (Globale partnership on Al) मध्ये सक्रीय सहभाग घेण्यात आला आहे. निती आयोगाच्या २०२१ मधील धोरणामध्ये देखील सर्वांसाठी विकास आणि कल्याणकारी योजना परिप्रेक्ष्येच्या केंद्रस्थानी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेची दुसरी आणि दुखरी बाजू सामरिक आयाम, कुरघोडीचे राजकारण यांवर प्रकाश टाकण्याची गरज आहे. उपरोक्त दिशेने प्रयत्न करण्यासाठी भारताला पारदर्शकता, उत्तरदायित्व, गोपनीयता, सुरक्षा, नैतिकता आणि मानवी दृष्टीकोन यांचा अंतर्भाव असलेला सबळ विदा नियामक आराखडा विकसित करणे गरजेचे आहे. भारताच्या प्राधान्यक्रमानुसार संशोधन आणि विकास यामध्ये गुंतवणूक तसेच विविध आंतरराष्ट्रीय हितसंबंधी गटामध्ये समन्वय साधणे यांमुळे नावीन्यपूर्ण तोडगे काढण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल.

(लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रिसर्च स्कॉलर असून तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

phanasepankaj@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Creative artificial intelligence and national security ssb

First published on: 17-08-2023 at 08:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×