पत्रकारांना हाताशी धरून, एक बँकही स्वतकडे ठेवून चार्ल्स पोन्झीचा गोरखधंदा सुरूच राहिला होता.. वासे फिरले, पोन्झीची फसवाफसवी उघड होऊ लागली, तेव्हा ‘पूर्वी कधीतरी केलेल्या चुकांचे किटाळ माझ्या आताच्या व्यवसायावर का उडवता?’ अशी गुर्मी दाखवणे त्याने सुरूच ठेवले. अखेर एकंदर १५ वर्षे त्याला कैदेत काढावी लागली, पण असे अनेक पोन्झी उद्भवतच राहिले..  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोस्टल कूपन योजनेतून अवाच्या सव्वा परतावा देणाऱ्या चार्ल्स पोन्झीचे गौडबंगाल शोधण्यासाठी मोठमोठय़ा बँका, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांची पराकाष्ठा सुरू होती. पण पोन्झी तेवढाच जागरूक होता. त्याने काही बातमीदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनाच आपल्या ठेवीमध्ये सामील करून घेतले होते. बलिदान केलेल्या पोलिसांसाठी असणाऱ्या निधीला त्याने गलेलठ्ठ देणगी दिली होती. खेरीज मी सर्वसामान्यांना श्रीमंत करतो आहे हे या गलेलठ्ठ बॉस्टन ब्राह्मण विघ्नकर्त्यांना पाहवत नाही, असा आक्रमक पवित्रा तो वारंवार घेत असे.
‘हॅनोव्हर ट्रस्ट’ या बँकेकडेही पोन्झीने लक्ष केंद्रित केले होते. एके काळी त्याला कर्ज मिळणार नाही म्हणून धुडकावले होते. आता पोन्झीची अतोनात मोठी ‘जमा ठेव’ या बँकेत भरली जात होती. एखाद्या दिवशी पोन्झीने ठेवी परत घेतो म्हटले तर बँकेचा धुव्वा उडणार होता. या बळावर बँक व्यवस्थापनाला वेठीस धरून त्याने या बँकेचे सर्वाधिक समभाग खरेदी केले. असाच घाट त्याने आणखी दोन बँकांमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. पण तो हवा तसा फलद्रूप झाला नाही. हॅनोवर ट्रस्ट ताब्यात ठेवण्यात पोन्झीचा हेतू दुहेरी होता. या कंपनीच्या समभागाचे वाढते मोल ही पोन्झीची वैयक्तिक मत्ता होती. खेरीज, हवी तशी वाढीव कर्जाची उचल आपल्या बहुमताच्या जिवावर मागता येईल असा त्याचा विश्वास होता. म्हणजे अगदी गळ्याशी आले तर बँकेकडून हवे तेवढे पैसे उचलून वेळ निभावता येईल अशी तजवीज होणार होती.
पण वर्तमानपत्रे, बँक-व्यापाराचे नियंत्रण अधिकारी आणि प्रतिस्पर्धी बँक व अन्य ‘संशयकार’ यांचा ससेमिरा काही कमी होत नव्हता. त्यात आणखी एक लचांड उपटले होते. सुरुवातीला त्याला कर्ज देणाऱ्या डॅनिएलने पोन्झीच्या संपत्तीत मूळ भांडवल पुरवठादार म्हणून माझाही वाटा आहे, असा दावा करीत पोन्झीच्या काही बँक ठेवींवर गोठवणूक आणली होती. त्यामुळे ठेवींच्या परतफेडीचे चाक थबकून अडकण्याची शक्यता होती. या गोठवणुकीला उत्तर म्हणून पोन्झीने दुहेरी हत्यार पाजळले. त्याने पुढच्या रकमा बेनामी ठेवी (म्हणजे खोटय़ा नावाने काढलेल्या खात्यात) टाकायला सुरुवात केली. खुद्द हॅनोव्हर ट्रस्टमध्येदेखील त्याने अशी बेनामी खाती काढली होती.)
दरम्यान, त्याने आणखी एक धाडसी खेळ केला. ‘माझ्याबद्दल संशय आहे ना, मग मीच काही काळ धंदा रोखतो. ठेवी घेणे बंद करतो. एक न्यायसंस्थेतील लोकांची समिती नेमतो. लोकांचे पैसे परत करण्याइतपत मत्ता माझ्याकडे आहे, असे समितीने सांगितले तर मग पुन्हा व्यवसाय सुरू करीन. दरम्यान, ज्यांना भीती वाटते त्यांनी ठेवी परत घेऊन जा. पण तेव्हा व्याज-नफा नाही देणार. काहींनी ठेवी काढून घेतल्या. पोन्झीला हे हवेच होते. कारण काढून घेतलेले प्रत्येक देणे पन्नास टक्क्यांनी कमी होणार होते! शिवाय शब्दाला जागल्याचे प्रशस्तिपत्र!
परंतु, पोन्झीच्या खेळाचा तराजू सतत संशय आणि अतोनात प्रशस्ती अशा झोक्यांमध्ये हलत राहिला. डॅनिएलच्या दाव्यामुळे गोठलेली खाती मोठी होती. अखेर पोन्झीने त्याला ‘मानवेल’ अशी रक्कम अदा करून दावा मागे घेतला. परतफेडीचा दाबदबाव सोसायला वेळ मिळाला. परंतु पोन्झीनेच नेमलेल्या एका प्रसिद्धी अधिकाऱ्याने पोन्झीकडे पुरेशी मत्ता नाही, एकाचे पैसे दुसऱ्याला फिरवत राहण्याचा हा मामला आहे असे सांगून टाकले. पुन्हा संशयाचे, परतफेडीचे, चौकशींचे मोहोळ उठले.
बँक क्षेत्रातील तपासणी अधिकाऱ्यांनी निरखून पाहणी करायला सुरुवात केली. हॅनोवर ट्रस्टमधल्या पोन्झीच्या खात्यातील भरणा व उचल याचे हेलकावे डोळ्यांत मावेनात एवढे मोठे होते. पोन्झीने अनेक बेनामी खाती ठेवली आहेत, त्यांतदेखील असे हेलकावे दिसत आहेत हेही त्यांच्या लक्षात आले. बँक निरीक्षकांचा डोळा आहे हे लक्षात आल्याने हॅनोवर ट्रस्टचे अन्य संचालक आणि अन्य बँकांचे संचालक गाळण उडाल्यागत सावध झाले. ‘पोस्टल युनियन कूपन्स’चा गोरखधंदा आहे, असा बभ्रा झाल्यावर पोस्ट अधिकारीपण सतर्क झाले. त्यांनी चौकशी केली. पोन्झीच्या दाव्यामध्ये हा फार कळीचा बचाव होता. पण खुद्द पोस्टमास्टर जनरलने जाहीर करून टाकले की, पोन्झीने गोळा केलेले ठेवीचे पैसे हे काही लाखांच्या आकडय़ात आहेत. मात्र पोस्टल युनियनची कूपन जेमतेम हजाराच्या आसपास आहेत. एका संशोधक पत्रकाराने पोन्झीने पैसे घेतले पण अन्य कुठल्या देशात तेवढे पाठविलेच नाहीत तर पोस्टल कूपन येणार कुठून आणि त्यातून किफायत मिळणारच कशी, अशी झोड उठवली.
हळूहळू पोन्झीचे दिवस भरत आले. उमेदवारीच्या काळात एका बँकेतील अफरातफर व खोटय़ा स्वाक्षऱ्या, खोटी पत्रे तयार करण्याच्या कटात त्याला कॅनडात तुरुंगवास भोगावा लागला होता. पाच इटालियनांना अमेरिकेत विनापरवाना घुसण्यासाठी मदत केल्यामुळे शिक्षा झाली होती. पोन्झीच्या मागावर असणाऱ्या वर्तमानपत्रांनी हे बिंग उघडकीस आणले. पोन्झीने प्रथम ते झिडकारले. मग हळूहळू स्वीकारले. ते पण जरा गुर्मट भावामध्येच! त्याचे म्हणणे होते की त्यातल्या मुख्य सूत्रधाराचा मी छोटा हस्तक होतो. तो मुख्य हस्तक आता पुन्हा मोठा प्रतिष्ठित बँक व्यवसायी बनला आहे. मग मला का धारेवर धरता? आणि तेव्हा केलेल्या चुकांचे किटाळ माझ्या आताच्या व्यवसायावर का उडवता? यामागे माझ्यामुळे हवालदिल झालेल्या वित्तसम्राटांचे मतलबी कारस्थान आहे.
पोन्झीच्या कारभाराची ‘खोल’ चौकशी करणाऱ्या अ‍ॅलेनने मात्र आपले काम धीमेपणे चालू ठेवले होते. ल्यूसी मार्टेली नावाच्या बेनामी खात्यातील पैसे वापरून पोन्झीचे परतफेड चक्र चालविले जाते हे त्याच्या खबऱ्यांनी हेरले. दरम्यान, पोन्झीने मँचेस्टर न्यू हॅम्पशायरमध्ये ठेवलेल्या खात्यातली रक्कम काढताना दोनदा जास्त रकमेचा धनादेश दिला. त्यामुळे ही भरभक्कम रक्कम मिळाली नाही. ते पैसे ‘मार्टेली’ खात्यात येऊ शकले नाहीत.
इकडे बॉस्टनमध्ये तर परतफेडीचे धनादेश वाटले गेले होते. बँक नियंत्रणाचा आयुक्त म्हणून अ‍ॅलेनला आता कारवाई करायला, हस्तक्षेप करायला धडधडीत निमित्त मिळाले. हॅनोवर ट्रस्टच्या कोषाधिकारी आणि संचालकांनी अ‍ॅलेनचे म्हणणे प्रथम धुडकावले पण दारावर ‘नोटीस’ ठोकल्यावर तेही वठणीवर आले. पोन्झीच्या सिक्युरिटी एक्स्चेंज कंपनीचे धनादेश वठविण्यास मनाई आली. हॅनोवर ट्रस्टकडे ठेवलेले पंधरा लाख डॉलर्सचे बॉण्डपण गोठवले गेले. पोन्झीकडे पैसे परत करण्याचा देखावा चालू ठेवणारे रस्ते नाकाबंदी होऊन थंडावले.
यामागे मला संपविण्याचा कट आहे, ‘वेळ दिला तर या चौकशीचे थोतांड मी उघडे पाडीन,’ अशा वल्गना करीत अखेर पोन्झीने आपल्या त्रुटी कबूल केल्या. तरी मला जर संधी दिली असती तर माझ्याकडे पुरेसे पैसे आणि मत्ता होती, असा हेका चालूच ठेवला. अखेरीस सर्व देण्यांची मोजदाद झाल्यावर मात्र त्याला गुन्हा कबूल करावा लागला! वरकड देणी होती तीस लाख डॉलर्स इतकी! चौकशी समितीतले दोन सदस्य आपल्या बाजूला असतील ही योजनासुद्धा फसली. कोर्टातदेखील बराच काळ पोन्झी गुन्हा कबूल करीत नव्हता. त्यानंतर सुरू झाले एकामागोमाग एक बाहेर येणारे फसवणुकीचे गुन्हे. ते अमेरिकेतल्या अनेक राज्यांत पसरले होते. प्रत्येक ठिकाणची शिक्षा भोगत त्याला जवळपास पंधरा वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. १९३४ मध्ये त्याची इटलीला ‘सन्मानपूर्वक’ रवानगी झाली.
पण पोन्झी छापाचे हे जाळे पुन:पुन्हा उद्भवत राहिले आहे. अगदी अलीकडे २००८ मध्ये असाच एक लफंगा माणूस उघडकीस आला. त्याची कथा पुढच्या वेळी.
*  लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final episode of ponzi trap