तरणतलावातील नियमावलीच्या बदलासह शुल्क दरवाढीचा प्रस्ताव मंजूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिकेचे तरणतलाव काही जलतरण संस्था सवलतीच्या दरात भाडय़ाने घेऊन त्या ठिकाणी नवशिकाऊ सभासदांकडून प्रशिक्षणाच्या नावाखाली अवाच्या सवा शुल्क आकारत असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले होते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी प्रशासनाने यासंबंधीच्या नियमावलीत अंशत: बदल करण्याचा निर्णय घेतला असून संस्थांच्या शुल्क दरात वाढ करण्याचे ठरविले होते. यासंबंधीच्या प्रस्तावास शुक्रवारच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.

ठाणे येथील गडकरी रंगायतन परिसरात कै. मारोतराव शिंदे आणि कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी असे दोन तरणतलाव पालिकेचे आहेत. हे तरणतलाव जलतरण संस्थांना विशेष बॅचकरिता सवलतीच्या दरात भाडय़ाने देण्यात येतात. त्यासाठी एका जलतरणपटूमागे दरताशी ३० रुपये दर आकारला जातो. या संस्थांना नवशिक्षितांना फ्लोटद्वारे प्रशिक्षण देण्यास बंदी आहे. असे असतानाही या संस्था सवलतीच्या दरात तरणतलाव भाडय़ाने घेतात आणि या काळात नवशिक्षितांना ‘फ्लोट’द्वारे प्रशिक्षण देतात. तसेच संस्था नवशिक्षितांकडून हजारो रुपये घेऊन व्यवसाय करतात, असे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या गैरप्रकाराबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. या तक्रारीनंतर महापालिकेने अशा संस्थांना तरणतलावात प्रशिक्षण देण्यास प्रतिबंध केला होता. मात्र, नियम नसल्याकडे बोट दाखवून संस्थांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले होते. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने आता नियमावलीत काही महत्त्वाचे बदल करण्यासह संस्थांच्या शुल्क दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

नव्या प्रस्तावात काय?

  • महापालिकेच्या तरणतलाव विशेष बॅचकरिता भाडय़ाने घेणाऱ्या संस्थांना प्रत्येक जलतरणपटूचे जिल्हास्तरीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
  • प्रवेश घेणाऱ्या सभासदांना आता  एक हजार रुपये आकारून महिन्याचा पास दिला जाणार.
  • फ्लोटचा वापर करून सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये ५० जलतरणपटूंना सराव करता येणार आहे. तसेच केवळ शनिवार आणि रविवार या दिवशी जलतरण संस्था आणि जलतरणपटूंना सरावासाठी एका तासाला सहाशे रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on swimming pool organisations dd70