डोंबिवली : महाराष्ट्रातील नाटय़ परंपरेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असून येथे नाटय़ संस्कृती खोलवर रुजली आहे. त्यामुळे आताच्या झपाटय़ाने बदलणाऱ्या समाजमाध्यमी वातावरणात विविध तंत्रस्नेही साधने उपलब्ध असली तरी मराठी नाटकांवर आणि त्यांच्या रसिक प्रेक्षकांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. उलट नाटकांच्या प्रेक्षक संख्येत वाढ होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी शनिवारी येथे केले. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील नाटक तिकीट खिडकी केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सावित्रीबाई फुले नाटय़मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा, साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. करोना महासाथीत दोन वर्षे नाटय़प्रयोग बंद होते. नाटय़संस्था, कलाकारांना त्याचा फटका बसला. तरीही मराठी नाटकांपासून नाटय़ प्रेक्षकांनी नाळ तुटलेली नाही. उलट ती घट्ट होत आहे. यापूर्वी दूरचित्रवाणी आली त्यावेळी मराठी नाटकांचे काय होणार म्हणून चर्चा होती. आता समाजमाध्यमी अनेक तंत्रस्नेही साधने आली आहेत. त्याचाही कोणताही परिणाम मराठी नाटक, प्रेक्षकांवर झालेला नाही आणि होणारही नाही, असा विश्वास  दामले यांनी व्यक्त केला. 

डोंबिवलीत दर्दी नाटय़ रसिक आहे. त्यांना प्रत्येक वेळी सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे जाऊन नाटय़तिकीट खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेने रेल्वे स्थानकाजवळ नाटकांच्या तिकीट खरेदीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रेक्षकांनी नियमित तिकिटे खरेदी करून अधिकाधिक नाटके पाहावीत, असे आवाहन दामले यांनी केले. अत्रे रंगमंदिरात रंगीत तालीम कक्ष सुरू करण्याबरोबर नूतनीकरण करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आवश्यक सुविधा दिल्या जातील, असे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase viewership of dramas technological change proposed prashant damle ysh