‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर प्रशासनाची धावाधाव
कल्याण पूर्व भागातील सरिता वसाहतीमधील ३०पेक्षा अधिक नागरिकांना काविळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने प्रसिद्ध करताच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने या परिसरातील इमारतींमधील रहिवाशांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. तसेच दूषित पाण्याचा पुरवठा नेमका कोणत्या जलवाहिनीतून झाला याचाही शोध घेण्यात आला असून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. सरिता वसाहतीलगत महापालिकेने खास रुग्णवाहिकाही तैनात केली असून येथील प्रत्येक रहिवाशाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. कल्याण परिसरातील काही वसाहतींमधील दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. यापैकीच एक असलेल्या सरिता वसाहतीत काविळीचे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याचे वृत्त देताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी वसाहतीच्या आवारात आरोग्य शिबीर भरविले. तसेच या इमारतीमधील प्रत्येक कुटुंबाला भेट देत या पथकाने तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्याबरोबर गुरुवारी या वसाहतीमध्ये रक्त तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या वसाहतीमध्ये गेल्या महिन्याभरापासून ३७ जणांना कावीळची लागण झाली आहे. प्रदूषित पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांना या आजाराला तोंड द्यावे लागले होते.
कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर परिसरातील सरिता सोसायटीमध्ये महिनाभरापासून कावीळची साथ सुरू झाली होती. प्रदूषित सांडपाणी जलवाहिनीमध्ये शिरल्याने हा प्रकार घडल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. सोसायटीतील सदस्यांनी वारंवार पाण्याची टाकी स्वच्छ करूनही हा त्रास कायम होता. अखेर महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेने यासाठी पाहणी करून जलवाहिनीतील प्रदूषित पाण्याचा पुरवठा बंद केला. या प्रकरणाचे ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या घटनेची माहिती होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून सोसायटीच्या परिसराचे निरीक्षण नोंदवले. त्यानंतर सोसायटी सदस्यांची चर्चा करून गुरुवारी या सोसायटीमध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’च्या बातमीमुळे आरोग्य विभागाने दाखवलेली तत्परता रहिवाशांसाठी सुखद धक्का होता. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकल्या. त्यामुळे येथील रहिवाशांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of citizens suffer from jaundice at kalyan